राम मंदिराची निर्मिती म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार – ह.भ.प. चारूदत्त आफळे

सोलापूर, (प्रतिनिधी):- रामजन्मभूमी असलेल्या आयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. चारूदत्त आफळे यांनी केले. श्री राम मंदिर निर्माण निधी संकलनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक सोलापूर यांच्या वतीने शनिवार दि. 9 जानेवारी 2021 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे राष्ट्रस्वाभिमान श्रीराम मंदिर निर्माण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

ह.भ.प. चारूदत्त आफळे

प्रभू श्रीरामांचे आयोध्येतील जन्मस्थान आणि त्या ठिकाणी राम मंदिर निर्माण हेच मूळ शक्ती स्वरूपस्थान अखिल भारताचे असणार आहे. रामतत्व संपूर्ण चराचरात आहे. अखिल भारतीय विचार प्रथम रामायाणात आला. प्रभु श्रीराम हे इतर राजाप्रमाणे इतरांना मांडलीक करून राज्यकारभार केला नाही तर सर्वांना आपला मित्र, बंधू करून घेत रामराज्य निर्माण केले या रामराज्यातून प्रेम, बंधुत्व, मैत्रीचे अधिराज्य दिसून आले हेच शेकडो वर्ष संत महंत सांगत आहेत. प्रभु श्रीरामचंद्रांचे जीवन आदर्शमय होते राष्ट्रात नवसंजीवन निर्माण करण्याचे कार्य रामायणातून झाले अलौकीक बंधुप्रेम आणि तपस्या हेही रामायणानेच शिकवले. आज प्रत्येकाच्या मनात असलेला राम आयोध्येत प्रतिष्ठापित होण्याची वेळ आली आहे असेही हभप चारूदत्त आफळे यांनी सांगितले.

 

संपूर्ण तीर्थक्षेत्राचे मुख्य तीर्थस्थान म्हणून आयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराचे असणार आहे त्यामुळेच प्रभु श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर आयोध्येत निर्माण करण्यात येत आहे त्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला पाहिजे असेही ह.भ.प.चारूदत्त आफळे यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि महाबली हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोलापूर जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय करून दिले  श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण धनसंग्रह अभियानाचे जबाबदारी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक सोलापूर यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे आणि शिवस्मारकाला तब्बल 74 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्त गेल्या 74 वर्षातील आढावा तसेच पुढील वर्षातील विविध उपक्रमाची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष दामोदर दरगड यांनी प्रास्ताविकात सांगितले.त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानाबाबतची माहिती दिली. दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते आयोध्येत श्री रामाचे मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले त्या मंदिराच्या निर्माणासाठी निधीची आवश्यकता आहे त्यासाठीच या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर या निधी संकलनात सहभाग घेतलेल्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी तरूणांची संख्या मोठ्याप्रमाणात होती. संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिरात जय श्रीराम आणि जय शिवाजी च्या घोषणा होत होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच श्रीराम मंदिर निर्माणावर तयार करण्यात आलेला एक माहितीपट दाखवण्यात आला. दि. 1 ते 31 जानेवारी 2021  या दरम्यान संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रभु श्रीराम नामाचा जागर करून मंदिर निर्माण निधी संकलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी हुतात्मा स्मृती मंदिर मधील रामपीठ आकर्षकरित्या सजवण्यात आले होते प्रशांत बडवे यांनी स्टेजची सजावट करून घेतली. कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे आभार सचिव गंगाधर गवसने यांनी व्यक्त केले तर प्रसाद जिरांकलगीकर यांच्या वंदे मातरम या राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाला शिवस्मारकचे कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, संचालक रंगनाथ बंकापुर,देवानंद चिलवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर शहर कार्यवाह राजेंद्र काटवे, सतीश आरगडे, विठ्ठल कदम, सतीश आरगडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्यासह मान्यवर आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.