नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे यांची माहिती
मुंबई दि. 14 : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्याकरीता पाच किलो मोफत तांदूळ व एक किलो अख्खा चना वाटप करण्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.
या योजनेच्या निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या महानगरपालिका व कामगार विभागाच्या मदतीने तयार करून घेण्यात आलेल्या आहेत.
मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील उपरोक्त निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित विभागाच्या शिधावाटप अधिकारी यांचे कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून माहे मे 2020 करिता प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वितरण दिनांक 29 मे 2020 रोजी पासून सुरू करण्यात आले आहे. तसेच माहे जून 2020 करीता सुद्धा या योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे. आतापर्यंत 1337 मे.टन मोफत तांदळाचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच या योजने अंतर्गत माहे मे आणि जून या महिन्याकरीता प्रतिकुटुंब प्रतिमाह 1 किलो मोफत अख्खा चण्याचे आतापर्यंत 31 मे.टन वाटप करण्यात आले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्याच्या मोफत तांदळाचे व मोफत अख्खा चण्याचे वितरण करण्यास दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असून याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या आपल्या विभागातील संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानातून कोणतीही गर्दी न करता योजनेतील धान्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही श्री.पगारे यांनी केले आहे.ठळक बाबी…
मे 2020 करिता प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ- वितरण दिनांक 29 मे 2020 रोजी पासून
आतापर्यंत 1337 मे.टन मोफत तांदळाचे वितरण
मे आणि जून या महिन्याकरीता प्रतिकुटुंब प्रतिमाह 1 किलो मोफत अख्खा चना
दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ
Leave a Reply