सोलापूर-दिल्ली साठी नव्या एक्सप्रेस रेल्वेची मागणी :खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य

सोलापूर ,दि.८ : सोलापूर ते दिल्ली साठी नव्या एक्स्प्रेस गाडीची आवश्यकता आहे. मध्य रेल्वे मधील अनेक स्थानकांवर एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांचे थांबे आवश्यक आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शक्य त्या मागण्यांची पूर्तता करून प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधेसाठी प्रयत्न करावेत जेणे करून उत्पन्न वाढ देखील होईल अशा सूचना खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर शिवाचार्य महास्वामीनी केल्या.
गुरुवारी मध्य रेल्वे विभागीय समितीच्या बैठकीत खा. डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी बोलत होते. या बैठकीत विभागीय समितीचे चेअरमन माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, कलबर्गी खासदार उमेश जाधव तसेच उस्मानाबाद, लातूर, सांगली मतदार संघाचे खासदार उपस्थित होते. याप्रसंगी खासदारांकडून विभागीय स्तरावरील समस्या, मागण्या यांचा आढावा घेण्यात आला. अनेक सूचना खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मांडल्या.
यामध्ये, पुणे – सोलापूर पॅसेंजर गाडी नंबर 51449 यास कलबुर्गी पर्यंत वाढीव मार्ग द्यावा. सोलापूर ते नवी दिल्ली दरम्यान आणखी एका एक्सप्रेसची मागणी केली. पंढरपूर, माळशिरस, फलटण या नवीन रेल्वे मार्ग मार्गी लावावा. सोलापूर, तुळजापूर, लातूर मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी. या कामात येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ स्वतंत्र बैठक आयोजित करावी. अक्कलकोट नाजिक गुरववाडी येथे स्थानिकांना येत असल्याली अडचण दूर करावी.
यासह covid- 19 च्या अनुषंगाने सोलापूर सह सर्व रेल्वे स्थानकांवर सर्व सुविधा पुरवाव्यात. डॉक्टरांसहीत सज्ज यंत्रणा ठेवावीत. सोलापूर रेल्वे स्थानकावरील वाढता ताण लक्षात घेता टिकेकरवाडी येथे टर्मिनल करण्याबाबत सव्हे करावा. रामवाडी जवळील बुकिंग काऊंटर वाढवावेत, तेथे सुविधा पुरवाव्यात. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 वर शुद्ध पाणी व स्वच्छता गृह उभारावेत, यासह अन्य मागण्या मांडत प्रशासनास खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सूचना केल्या.