Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सरकारी नोकरी म्हणजेच सुखाची भाकरी असं समीकरण आपल्याला वारंवार ऐकायला मिळतं. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अहोरात्र झटतात. यात विशेष म्हणजे गृहखात्यातील पोलीस दलात भरती होण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असते. मात्र गेल्या काही वर्षभरात पोलीस दलातील नोकर भरतीची जाहिरात न आल्याने निराश न होता युवक करिअरसाठी दुसरा मार्ग शोधत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून सोलापूर शहरातील एक तरूण शेती करायला लागला आहे.

ही कहाणी आहे सलमान नबीलाल निगेबान या २८ वर्षीय धाडसी तरुणाची. सलमान हा मूळचा सोलापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावचा रहिवासी. त्यांचे वडील मंद्रुप पोलीस स्टेशन येथे एसआय पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे तो शहरातील पोलीस कवितानगर पोलीस वसाहत येथे राहत होता. वडिलांप्रमाणे आपणही पोलीस दलात भरती व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे तो गेल्या चार पाच वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. पण त्याला इथं त्याला नशीबाची साथ मिळत नसल्याने यश सतत हुलकावणी देत आहे.

शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि पोलीस भरतीची जाहिरात लवकर येत नसल्याने सलमान मंद्रूप येथे स्थायिक झाला. हताश न होता त्याने आपल्या करिअरसाठी दुसरा मार्ग म्हणजेच शाश्वत शेती करण्याचा विचार केला. मंद्रूप येथे त्यांची परंपरागत तीन एकर शेती. वास्तविक पाहता त्याला शेतीविषयी जुजबी ज्ञान होते. आपली शेती फुलवण्यासाठी त्य‍ाने यूट्यूब, व्हॉट्सॲप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाचा आधार सल्ला घेत त्याने आपली परंपरागत शेती कसायला सुरुवात केली. कोरोना आणि लॉकडाऊन च्या काळात त्याने आपल्या शेतात झेंडू आणि गहू चे उत्पादन घेतले.

सलमानने शेतीत केलेले प्रयोग यशस्वी देखील झाले. मिळालेल्या भरघोस उत्पादनामुळे त्याचा शेती करण्याविषयीचा आत्मविश्वास वाढू लागला. सध्या त्याच्या एक एकर क्षेत्रात गहू ची लागवड केली आहे. पोलीस भरतीसाठी प्रचंड शारीरिक मेहनत घेणारा सलमान आज शेतीत रात्रंदिवस राबतोय. बाजारपेठेतील उतरणारे भाव, निसर्गाचा फटका, उत्पादनाची अनिश्चितता यामुळे आजचा युवक फारसा शेतीकडे वळताना फारसा धजावत नाही. दुसरीकडे मात्र सलमानने शेतीत देखील उत्तम करिअर होऊ शकते हे दाखवून दिले आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा विचार 

सलमान आता शेतीतील एक एकर परिसरात जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आणि शेळीपालन करण्याचा विचार करत आहे. यासाठी त्याने तयारी सुरू केली आहे. यासाठी तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेत आहे. शेतीला जोडधंदा असला तर शेतीत येणारे तोटे भरून काढून शेतीदेखील यशस्वी ठरते, असा त्याचा विचार जोडधंदा सुरू करण्यापाठीमागे आहे.

कधी होणार नोकरभरती? 

नोकर भरती बंदी, कोरोनाचे संकट, बदलते राजकीय धोरण अशा अनेक कारणांमुळे सरकारी नोकर भरतीसाठी जाहिरात आली नाही. यामुळे कित्येक तरूणांचे नोकरभरतीचे वय निघून गेल्याने सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. नोकरभरती न निघाल्याने निराश न होता अशा कठीण प्रसंगी सलमानने पर्याय म्हणून शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय आदर्शवत म्हणावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *