Big 9 News Network
आज पुण्यात कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करणे, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, अशा सूचना केल्या. आरोग्य सुविधा वाढवणं, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच कोरोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासन स्तरावर सातत्यानं प्रयत्न सुरु आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधांमध्ये तातडीनं वाढ करा, ग्रामीण भागात रूग्ण संख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणं आवश्यक आहे. आवश्यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी सतत समन्वय ठेवावा. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणासाठी राज्य शासनानं आवश्यक निधीची तरतुद केलेली आहे. परंतू लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्यानं नागरिकांनी लगेच लस केंद्रांवर गर्दी करू नये. कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल; त्यादिवशी जाऊन लस घ्यावी. कोरोना महामारीच्या संकट काळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावं, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल, असा मला विश्वास आहे.
Leave a Reply