मुंबई,दि.23 : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. संकटामागून संकट आली आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत 30 हजार 800 कोटी दिले आहेत. संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.
सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
दहा हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरांसाठी, रस्ते-पुलाचं बांधकाम, पाणी पुरवठा याचा समावेश आहे. रस्ते- पूल – 2635 कोटी, नगर विकास – 300 कोटी,
महावितरण ऊर्जा – 239 कोटी, जलसंपदा – 102 कोटी, ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा – 1000 कोटी, कृषी-शेती-घरासाठी – 5500 कोटी.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना आज दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 10 हजार कोटी रुपयांचे नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केले आहे.