Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

आपण स्वतःला या पृथ्वीचे मालक समजू लागलो आहोत, जमिनीवरचा कायदा हा आपला आहे. पण निसर्गाचे नियम त्यापेक्षा वेगळे आहेत. ते नियम आपण पाळले नाही तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे असे सांगून आपल्याला आपले वन आणि वन्यजीव वैभव जपायचे आहेच. त्यासाठी जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाऊया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साई प्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते.तर राज्यभरातून वन विभागातील अधिकारी ,कर्मचारी,वन्यप्रेमी नागरिक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले,आपण कायदे करतो आणि आपल्या सोयी प्रमाणे त्याचा अर्थ लावतो. विकासाचे वेडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणता विनाश करत आहोत हे न बघता आज आपण पुढं जात आहोत.चक्रीवादळ, अतिवृष्टी ही त्याची उदाहरणे आहेत.आपण वनांमध्ये घुसखोरी करीत आहोत. निसर्गावर आपण आक्रमण केले आणि ते असह्य झाले की निसर्ग आपले अतिक्रमण आपल्या पद्धतीने दूर करतो.त्यामुळे समजून, विचार करून पुढे जाणे गरजेचे आहे.वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही झाली पाहिजे असे मत मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केले.


शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भातील रुची निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.नाशिकला ‘मित्रा’नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.या संस्थेत पर्यावरणपूरक विकास कसा करायचा या संबंधीचा अभ्यास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अन्न ,वस्त्र ,निवारा या मानवी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यातही निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपण वस्त्या वाढवत आहोत, जंगलांमध्ये जात आहोत. वाढणाऱ्या मानवी वस्त्यांना मूलभूत सुविधा,पाणी कसे द्यायचे याचा विचार करण्याची गरज आहे कारण त्या सुविधा देताना लाखो झाडांची आहुती द्यावी लागते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, जिथे जंगल अधिक तिकडे पाऊस जास्त पडतो. पण अलिकडच्या काळात हे चित्र बदलते आहे. चेरापुंजी नाही तर दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडत आहे, कोकण , मराठवाड्यात आपण अशी अतिवृष्टी पहिली आहे.त्यामुळे वन व वन्यजीव संवर्धन हे महत्त्वाचे आहे.
वन संरक्षक हे वनांचे खरे रक्षक त्यांना आगामी काळात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं वनप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. वनांचं, वन्यप्राण्याचं महत्व सगळ्यांना, विशेष करुन लहान मुलांना, भावी पिढीला कळावं, हा प्रयत्न आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून वनांचं, वन्यप्राण्यांचं अस्तित्व, जगासाठी, माणसांसाठी किती महत्वाचं आहे, हे समजवण्यात आपल्याला यश मिळेल, वन्यप्राणी संरक्षणाच्या चळवळीला बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’ असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ,महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. “हेरिटेज ट्री” संरक्षणासाठीचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. झाडांसह समस्त प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्नाची आवश्यकता असते. ही मूलभूत गरज आहे. ती फक्त निसर्गातून, पर्यावरणातूच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी निसर्गाचं, पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन महत्वाचं आहे. म्हणून राज्यात जंगलांचं क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.


भारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडं लावण्याची गरज
गाव, शहर, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात, रस्त्यांच्या कडेला, ओसाड डोंगरावर, मोकळ्या माळावर, शक्य आहे त्या ठिकाणी, आंबा, वड, पिंपळ अशी दीर्घ काळ टिकणारी, भारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडं लावली पाहिजेत. पाण्याचं प्रदुषण ही सुद्धा गंभीर समस्या आहे. हे थांबवण्यासाठी जागरुकता आणणं महत्वाचं आहे. नदी, ओढे, विहिरी, झरे हे जलस्त्रोत, जलप्रवाह प्रदूषणमुक्त ठेवले पाहिजेत. शुद्ध, स्वच्छ, मोकळी, प्रदूषणमुक्त हवा मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करुया. निसर्गाच्या हानीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनतेला जागरुक करुया. त्याआधी स्वत: जागरुक होऊया. स्वत:ला शिस्त लावून घेऊया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वने,हवामान बदल तसेच वन्यजीव संरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे जसा शाश्वत विकास अपेक्षित आहे तसा आता होत आहे. मुंबईतील ८०८ एकर आरेचे जंगल शासनाने राखीव वन म्हणून घोषित केलेआहे.जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असेल. राज्यात ९ हजार ८०० हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्यात आले आहे.मुंबईतील धारावीमध्येही आगामी काळात कांदळवन घोषित करण्यात येणार आहे.वन रक्षकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याची गरज आहे.प्रदूषण रोखण्याचा उपाय म्हणून तळेगाव येथे इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती सुरू होणार आहे.जंगल, कांदळवन व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासन कटिबध्द आहे .पर्यावरणाच्या जपणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांनी दिली.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) जी.साईप्रकाश म्हणाले, वन्यजीव सप्ताहानिमित्त या पूर्ण आठवड्यात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाची जनजागृती वाढवणारे वेगवेगळे उपक्रम रावबविण्यात येतील.शाळांमध्ये येत्या वर्षात व महाविद्यालयातील युवकांना वन व वन्यजीव संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी म्हणाले, ‘वनावर आधारित उपजीविका -मनुष्य आणि सृष्टीचा चिरंतन विकास’ ही यंदाच्या वन्यजीव सप्ताहाची वर्षाची संकल्पना आहे.येत्या काळात वन विभागातर्फे मानव – वन्यजीव शांततापूर्ण सहजीवनासाठी प्रयत्न करणार असून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.
वन्यजीव सप्ताहाची सुरुवात मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनानं झाली. पेंच प्रकल्पाच्या लोगोचं अनावरण आणि ‘वाईल्ड महाराष्ट्र’ पुस्तकाचं प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयांची माहितीही यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *