स्ट्रीट बाजार की मवाल्यांचा अड्डा.. ? महिलावर्ग संतप्त

Big9news Network

सोलापुरातील होम मैदान परिसरात मोठ्या दिमाखाने स्ट्रीट बाजार निर्माण करण्यात आला. सोलापूरकरांसाठी आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठी हे सेल्फी पॉइंट ठरत आहे. मात्र एकदा संध्याकाळ झाली की येथे मवाल्यांचा अड्डा जमतो. आणि सुरू होते इव्हिनिंग वॉक करणाऱ्या महिलांची टिंगल-टवाळी… सभ्य आणि प्रतिष्ठित मंडळी गपचूप मान खाली घालून निघून जातात.अत्यंत अश्लील आणि अर्वाच्य भाषेत टवाळकी करत असल्याची माहिती या भागात सायंकाळी फिरत असलेल्या महिलांनी MH 13 न्यूजशी बोलताना दिली.

सोलापूर महानगरपालिकेने होम मैदान परिसरात स्ट्रीट बाजार निर्माण केला. त्याचे मोठे कौतुक झाले. गाडी पार्किंगसाठी पैसे आकारणी सुरू झाली. तरुण-तरुणींचे जथ्थे सोलापुरातील या सेल्फी पॉइंट जवळ येऊ लागल्या. ज्येष्ठ नागरिक तसेच महिलावर्ग यांना फिरण्यासाठी स्मार्ट सिटीने चांगला रस्ता निर्माण केला. परंतु, हा परिसर सध्याला मवाल्यांचा अड्डा झाला आहे. सायंकाळी सहाच्या नंतर तोंडात मावा, गुटख्याला बंदी असताना सर्रास मिळतो तो भाग वेगळा..! क्या आयटम हैं..! ईस्को तो मैं ऐसा करता ना..! ड्रेस तो देख रे…गांजा लावून सुजलेले डोळे, तोंडात भरलेला ओला माव्याचा तोबरा, किमान 10 बाईकवर ट्रिपल सीट आलेली गॅंग फिरणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.

पोलिसांकडे तक्रार करण्याची भीती –
सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी या गर्दुल्ले गॅंगचे कंबरडे मोडावे, आम्हाला प्रचंड त्रास होत आहे, आज तक्रार केली तर उद्या फिरताना अजून त्रास होईल, रोज शिवीगाळ खातो परत मार खावा लागेल या भीतीने कोणी पोलीस तक्रार करत नाही इतकी दहशत निर्माण झाली आहे.

राउंड ची गाडी येते..! –
अधून मधून राउंडची गाडी येते त्यात वाहनचालक, एक महिला पोलिस असते परंतु ,गर्दुल्यांच्या गॅंगकडे दुर्लक्ष करून जोडपे अथवा फिरत असलेल्या नागरिकांनाच दमबाजी करण्यात येते. असे येथील फिरणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे.

काल रात्रीचाच प्रकार –
एक नवविवाहीत जोडपे स्ट्रीट बाजार जवळ बसले असताना गर्दुल्ल्यांची गॅंग आजूबाजूला होती. अत्यंत अश्लील भाषेत आणि मोठ्या आवाजात टवाळकी सुरू असल्याने नाईलाज म्हणून त्या जोडप्याला तेथून उठून जावे लागले. रंगभवनच्या जवळील परिसरात हे जोडपे बसले तेव्हा पोलिसांची गाडी आली. आणि दमबाजी करत घ्या रे याला आत.. आत्ताच लग्न झालंय का..! तू पोरगी पळवून आणली का.? चल चौकीला अशी भाषा सुरू झाल्यावर त्या युवकाने माझ्यावर कारवाई करण्याच्या आधी स्ट्रीट बाजारवर काय प्रकार चालू आहे तो बघा असे सांगितले. तर, मला शहाणपण शिकवणारा तू कोण अशी विचारणा महिला पोलीस यांनी केली.

शेवटी नाईलाज म्हणून ते जोडपे तेथून निघून गेले. जोडप्यांनी mh13 न्यूज शी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. या अशा गोष्टींमुळे सोलापूरची प्रतिमा बदनाम होते असेही सांगायला ते विसरले नाहीत.

नागरिकांनी अशा प्रकारचा विरोधात कोणतीही अडचण असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. त्या ठिकाणी रोज पोलीस गस्त,दामिनी पथक यांची राऊंड घेण्यात येईल. समाजकंटकांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल.

बापू बांगर
पोलीस उपायुक्त (गुन्हे आणि विशेष शाखा)