Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

सोलापूर : शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे पदाधिकारी थेट शाखाप्रमुख, शिवसैनिकांशी भेटून संवाद साधणार आहेत. यातून पक्षाची मोर्चेबांधणी शिवसेना करणार आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार १२ ते २४ जुलै दरम्यान हे अभियान चालणार आहे. याबाबतचा निर्णय रविवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, शिवसेनेची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियानाची आखणी करण्यात आली आहे. शिवसेनेप्रणित युवा सेना, कामगार सेना, महिला आघाडी, रिक्षा सेना अशा सर्व संघटना मजबूत करणे याला या अभियानात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. शहरात प्रत्येक प्रभागात तर ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती गणात बैठका आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आगामी महापालिका, पंचायत समित्या, विधानसभा अशा सर्व निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी शिवसंपर्क अभियान जोरदारपणे राबवावे असे आवाहनही जिल्हाप्रमुख श्री. बरडे यांनी केले.

जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधत जनतेच्या अडचणी समजून घ्याव्यात. त्यावर उपाय योजना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील असा शब्द स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी अधिकाधिक संपर्क करावा असे आवाहनही जिल्हाप्रमुख श्री. वानकर यांनी यावेळी केले.

शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, शिवसंपर्क अभियान हे पक्षाला आणखी बळ देणारे अभियान ठरणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले सरकार राज्यात करत असलेल्या विकासकामांची, जनतेसाठी घेत असलेल्या निर्णयांची माहिती शिवसैनिकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवावी. नव्या आणि जुन्या शिवसैनिकांशी संपर्क करून त्यांना पक्ष कार्याशी जोडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शहरप्रमुख श्री. धुत्तरगावकर यांनी केले.

यावेळी महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, विष्णू कारमपुरी, संतोष पाटील, अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, विष्णू कारमपुरी, संतोष पाटील, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, निरंजन बोद्धूल, परिवहन समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, लहू गायकवाड, सुरेश जगताप, अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख योगीराज पाटील, युवासेनेचे विठ्ठल वानकर, अक्कलकोट शहरप्रमुख योगेश पवार, अंत्रोळीच्या सरपंच कोमल करपे, उपशहरप्रमुख धनराज जाधव, मलिक हब्बू, चंद्रकांत मानवी, रेवण बुक्कानुरे, सोमनाथ शिंदे, वैद्यकीय सहायता कक्षाचे अतुल भंवर व रविकांत गायकवाड, रविकांत कांबळे, उज्वल दीक्षित, सचिन गंधुरे, आनंद मुसळे, बालाजी चौगुले, मनिष काळजे, बसवराज जमखंडी आदी उपस्थित होते.

तब्बल ५० बैठकांचे नियोजन

सोलापूर शहरातील २६ प्रभागांच्या २६ बैठका तसेच दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट येथील प्रत्येकी १२ पंचायत समिती गणांच्या २४ अशा एकूण तब्बल ५० बैठकांचे नियोजन यावेळी करण्यात आले. या बैठकांमुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *