सोलापुरात येऊ शकते तिसरी लाट ;नागरिकांनी दक्ष राहा- पालकमंत्री

BIG 9 NEWS NETWORK

सोलापूर, दि.11: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

नियोजन भवन  येथे कोरोना रुग्णांच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळीजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविली आहे. त्यामध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता जास्त असल्याने  त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.

तिसऱ्या लाटेबाबत सोलापूर जिल्ह्याची तयारी उत्कृष्ट झाली आहे. मुलांना असलेला संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यात 1400 बेडची क्षमता तयार केली आहे. यामध्ये 1200 शासकीय, खासगी आणि सिव्हीलमध्ये 100 साधे, 50 अतिदक्षता बेडची क्षमता तयार ठेवली आहे. जी मुले नियमित लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांचे इंद्रधनुष्य अभियानामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. कुपोषित बालके, गरोदर माता आणि कोमॉरबिड रुग्ण, दुर्धर आजाराची बालके यांच्या घरातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी करावी. त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करून दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात सध्या 3370 रुग्ण उपचार घेत असून यामध्ये म्युकरमायकोसिसचे 180 रुग्ण आहेत. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी जिल्ह्यात 32 दवाखाने आहेत. सिव्हीलमध्ये 70 तर खासगी दवाखान्यात 110 म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.