Big9news Network
कोविड-19 संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोविड प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाने कोविड उपचारांकरिता लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगिक उपाययोजना करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग शास्त्र विभागातील प्राध्यापक व विभागप्रमुख यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि बालरोगशास्त्र प्रमुख उपस्थित होते.
मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, कोविड-19 ची तिसरी लाट येण्याची शक्यता असून यामध्ये लहान मुलांना धोका अधिक आहे असे वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आवश्यक खबरदारी म्हणून प्रत्येक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा यांच्यासह वेगवेगळ्या उपाययोजना, विशिष्ट औषधांची यादी याबाबतची माहिती सर्व अधिष्ठाता यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे त्वरित पाठविण्यात यावी.
कोविडच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांची काळजी आणि उपचार याला प्राधान्य देत असताना वैद्यकीय महाविद्यालयातील लहान मुलांच्या कक्षात तातडीने सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी विशेष कक्ष आहे तेथे अजून कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत याची यादी पाठविण्यात यावी. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून टिपणी मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालक या सर्व टिपणीचा अभ्यास करून लहान मुलांसाठी कोविड अनुषंगाने करण्यात येणारी उपचारपद्धती आणि व्यवस्थापन याबाबत निश्चित धोरण करतील, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविडची लक्षणे असलेल्या मुलांना करण्यात येणारे उपचार, समुपदेशन यावर भर देताना लहान मुलांचे पालक यांचे सुद्धा समुपदेशन करण्यात यावे, जेणेकरून रुग्णालयातून लहान मुले घरी गेल्यानंतर त्यांना कोणताही त्रास होणार नाही. येणाऱ्या काळात शासकीय रुग्णालयांत टेली काऊन्सिलिंग आणि हेल्पलाइन सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असेही मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.