Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूर /प्रतिनिधी

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त शहर व जिल्हा शिवसेनेकडून ‘शिवसेना आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य आणि पर्यावरण विषयक उपक्रमांवर भर देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, विष्णू कारमपुरी, भीमाशंकर म्हेत्रे, भारतीय विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक
महेश धारशिवकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, १३ जून रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या दरम्यान शिवसेनेकडून आरोग्य सप्ताह घेण्यात येणार आहे. यासाठी ५० शिवसैनिक आणि युवा सैनिकांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक घरोघरी जाऊन ज्या नागरिकांना लस घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणीची अडचण आहे अशांना ऑनलाईन नोंदणी करून देईल. त्याशिवाय पर्यावरण विषयक उपक्रमांतंर्गत वृक्षारोपण आणि संगोपनाची मोहीम जिल्हास्तरावर शिवसेनेकडून राबविली जाईल. शिवसैनिक हे आजवरप्रमाणे पुढेही फ्रंटलाईन वर्कर प्रमाणेच काम करतील.

जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, जनतेसाठी काम करणे हेच खऱ्या अर्थाने पक्षाचे काम आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करीत सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे. पदापेक्षा शिवसैनिक पद महत्वाचे आहे. गटतट सोडून एकदिलाने सर्व शिवसैनिकांनी पक्षाचे काम करावे. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी, झाडे लावून त्यांचे संगोपन होण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यक्रमांची आखणी करावी असे आवाहनही जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिरे भरवून अधिकाधिक गरजूंसाठी रक्त उपलब्ध करून देण्याचे आवाहन प्रकाश वानकर यांनी यावेळी केले. शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले,
शिवसेनेचा उत्कर्ष निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावरच झाला आहे. आजवर अनेक संकटे आली तर शिवसैनिकांनी समाजाला कायम मदतच केली आहे. यंदा कोविड महामारीमुळे संकटात सापडलेल्या सोलापूरकरांच्या मदतीसाठी शिवसैनिक धावून जात आहेत. विविध उपक्रमांतून शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याचे शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सांगितले. विडी घरकुल येथे एक हजार ३८० घरांसमोर तितकीच झाडे लावणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी जाहीर केले.

या बैठकीस नगरसेवक राजकुमार हंचाटे, विजय पुकाळे, लहू गायकवाड, संताजी भोळे,
भागवत जोगधनकर, रिक्षा सेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश जगताप, निरंजन बोद्धूल, शिवसेना दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख योगीराज पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल भंवर, शहर प्रमुख महेश गायकवाड, उपशहरप्रमुख संतोष पाटील, परिवहन समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख रोहित तडवळकर, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख तुषार आवताडे आदी उपस्थित होते.

राहुल गंधुरे यांनी सूत्रसंचालन केले. शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रास्ताविक तर महेश धाराशिवकर यांनी आभार प्रदर्शन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी ग्रामपंचायत ते मंत्रालयापर्यंत सर्वत्र भगवा ध्वज लावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मांडला. यावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवराय’ च्या जयघोषात अनुमोदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *