BIG 9 NEWS NETWORK
मंद्रुप – मंद्रुप महावितरणच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वीज बिलाचा शॉक बसत असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांना अव्वाच्या सव्वा विजेची बिलं महावितरणकडून आकारली जात आहेत. काही नागरिकांना तर वीज बिल देखील घरापर्यंत मिळत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरासरी वीज बिल देणाऱ्या महावितरणने ग्राहकांना भरमसाट बिल पाठवलं आहे. काही ग्राहकांना तर वापरापेक्षा जास्त बिलं आली आहेत.
अनेक ग्राहकांनी सरासरी वीज बिलंही भरली, तरीही महावितरणाने त्यांना मोठ्या रकमेची वीज बिलं पाठवली. याबाबत महावितरणच्या कार्यालयात विचारपूस केले असता थेट बिल कमी करून भरणा करून घेतलं जात आहे. यामुळे महावितरण देखील तोट्यात जाण्याची शक्यता आहे आणि नागरिकांना वापरापेक्षा कमी-अधिक बिल भरावी लागत आहे.
कमी-अधिक फरकाने प्रत्येक वीज ग्राहकाची हीच तक्रार आहे. ग्राहक जे बिल असेल ते भरायला तयार आहे. पण ते वीज बिल नेमकं आणि अचूक असावं, हीच ग्राहकांची अपेक्षा असल्याचे मत येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.