Big9news Network
सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विविध अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आलेला होता. या सर्वेक्षणामध्ये एकूण 122 विशेष गरजा असणारी बालके आढळून आलेली होती. या बालकांचे निदान करून, तसेच त्यांना उपचार करून त्यांच्या गरजेनुरूप सेवा-सुविधांची निश्चिती करणे आणि त्याचबरोबर सोलापूर शहरातील विविध शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या 1002 विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे औपचारिक कार्यात्मक व मूल्यमापन शिबिर आयोजित करून सदर शिबिरामध्ये त्यांच्या गरजेनुरूप सेवा-सुविधांची निश्चिती करून सदर सेवा महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अंतर्गत तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत पुरविण्यात येणार आहेत.
मा. श्री. धनराज पांडे, उपायुक्त सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीची प्रस्तावना प्रशासन अधिकारी श्री. कादर शेख यांनी केली. त्यामध्ये अल्पदृष्टी प्रकारातील एकूण 326 बालकांचे दृष्टी मूल्यमापन करणे. एकूण 310 विद्यार्थ्यांचे शारीरिक मूल्यमापन तसेच एकूण 221 बालकांचे वाचा व श्रवण मूल्यमापन करणे व मानसशास्त्रीय शैक्षणिक मूल्यमापन आवश्यक असणारे एकूण 254 विद्यार्थी असल्याचे सांगितले. सदर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, निदान व गरजांची निश्चिती करण्यासाठी मिशन मोड पद्धतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे शिबिर आयोजित करण्याच्या अनुषंगाने चर्चा करून निर्णय घेण्यात आलेले आहेत. सदर शिबिर दिनांक 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार असून या शिबिरामध्ये पात्र असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रमाणानुसार युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी (UDID कार्ड) व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या बैठकीमध्ये अधिष्ठाता डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांचे प्रतिनिधी आणि जिल्हा शल्य चिकित्सक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांचे प्रतिनिधी, तसेच अस्थीरोग विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग प्रमुख, कान, नाक, घसा विभाग प्रमुख, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक, एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना अंतर्गत प्रकल्प 1, 2 व 3 चे प्रकल्प अधिकारी, महानगरपालिका सोलापूर चे आरोग्य अधिकारी डॉ. श्री. बसवराज लोहारे, समावेशित शिक्षण विभागाचे समन्वयक श्री. अविनाश शिंदे, विषय तज्ञ सचिन जाधव, श्री गुरुप्रसाद तलवार हे सदर बैठकीस उपस्थित होते.