BIG 9 NEWS NETWORK
सलग दुसऱ्या वर्षीही गुरू -शिष्यांच्या भेटीची परंपरा खंडित
गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील महतीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थनाच गुरु मानणारे असंख्य स्वामी भक्त असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या दि. २५ मार्च रोजी स्वामींचे वटवृक्ष मंदीर पुन्हा बंद करण्यात आले ते आजमितीपर्यंत बंदच आहे. मंदिरातील स्वामींचे नित्योपचार, नित्यक्रम, पूजाअर्चा, धार्मिक विधी हे नियमितपणे चालू आहेत. या पार्श्वभुमीवर आज शुक्रवार दिनांक २३ जुलै रोजी वटवृक्ष मंदिरातील श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने कोणत्याही भाविकांविना साजरा करण्यात आला. गुरूपौर्णिमेजी पहाटे पाच वाजता स्वामींची काकड आरती पुरोहित मोहन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात व सकाळी ११ वाजता गुरुपौर्णिमेची महानैवेद्य आरती मंदार पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी कोणत्याही भाविकांचा सहभाग नव्हता. आरतीनंतर मंदीर बंद करून गाभारा मंडपाचे प्रवेशद्वार त्वरित बंद करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अनंतकोटी ब्रह्मांड नायक वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या प्रति अनेक स्वामी भक्तांच्या मनात असलेल्या गुरुस्थानामुळे आपल्या या वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमेस दरवर्षी अनेक स्वामी भक्त स्वामींच्या भेटीकरिता येथे येत असतात, परंतु यंदाही गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तास कोरोना लॉकडाऊनमुळेविघ्न लागल्याने स्वामींनाच गुरु मानणाऱ्या भाविक शिष्यांना यंदाही स्वामी दर्शनास मुकावे लागले आहे. या कोरोना नामक जागतिक संकटामुळे यंदा गुरुशिष्यांच्या भेटीची परंपरा इतिहासात दुसऱ्यांदा खंडित झाली असल्याचे सांगितले. याप्रसंगी संकटातून स्वामींनी संपूर्ण जगास लवकरात लवकर मुक्त करावे या करिता श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे सांगून स्वामी भक्तांनी देखील गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही घरीच थांबून स्वामींची आराधना करावी असे आवाहनही इंगळे यांनी या प्रसंगी केले.
Leave a Reply