Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर, दि. २४: करमाळा तालुक्यातील कोरोना रूग्णांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नका. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा बळी जाऊ नये, यासाठी तालुक्यातील जेऊर येथे २० आणि करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ऑक्सिजन बेडची सुविधा त्वरित निर्माण करणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

करमाळा येथे कोविड१९ संबंधित उपाययोजना आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी आमदार नारायण पाटील, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंंडे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार सुुनील माने, रश्मी बागल आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, संपूर्ण देशात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. प्रत्येक नागरिकांनी ऑक्सिजनची स्थिती येईपर्यंत अंगावर आजार काढू नये. त्वरित तपासणी करून विलगीकरणात राहून उपचार घ्यावेत. नागरिकांचा जीव महत्वाचा असून येत्या दोन दिवसात आणखी पाच ठिकाणी जिंती, कोर्टी, वरकुटे, जेऊर, शेलार हॉस्पिटल आणि लोकरे हॉस्पिटलमध्ये १०० ऑक्सिजन बेड करण्याचे प्रस्तावित आहे. याठिकाणी सर्व वैद्यकीय स्टाफ भरण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांनी जनतेच्या जीवाशी खेळू नये, जागरूक राहून काम करावे. प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये सोयी-सुविधेचा अभाव राहता कामा नये. येत्या आठवड्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित होणार आहे. ऑक्सिजनचे योग्य नियोजन करा. प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देणे गरजेचे नाही, हे रुग्णाला आणि जनतेला डॉक्टरांनी द्यायला हवे. ज्याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तिथे खाजगी रुग्णवाहिका घेऊन त्याचे भाडे, डिझेल सरकार देईल, असेही त्यांनी सांगितले.

आज १५ हजार लस उपलब्ध झाली असून लसीचे योग्य नियोजन करा, गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिसांनी लॉकडाऊनची कडक अमलबजावणी करावी, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.

संजीव जाधव म्हणाले, कोरोनाचा रुग्ण सामान्य असेल तर डॉक्टरांनी रेमडेसिवीरची सक्ती करू नये. इतर पर्यायाचा वापर करावा.

श्रीमती कदम यांनी तालुक्यातील कोरोना स्थिती आणि उपाययोजना याबाबत माहिती दिली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ अनिरुद्ध पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *