Big9news Network
नागपूर जिल्ह्यामध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू असणाऱ्या मतदार नोंदणी अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात हे अभियान अतिशय गतिशील करा. मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंदणी करा. 27 व 28 या दिवशी जिल्हा प्रशासनाने सर्व घटकातील मतदारांची नोंदणी व निवडणूक प्रक्रिया अतिशय गतिशीलतेने राबवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर., विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त आशा पठाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व निवडणूक विभागातील कर्मचारी उपस्थित होते .
विभागीय आयुक्तांमार्फत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याच्या मतदार नोंदणी अभियानाचा आढावा घेतला जात आहे. आज या संदर्भात नागपूर जिल्ह्याचा आढावा त्यांनी घेतला.
राज्यभरात 30 नोव्हेंबर पर्यंत विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत 20 व 21 तसेच आगामी 27 व 28 नोव्हेंबर रोजी नव्याने मतदार होणारे मतदार, तसेच स्थानांतरण व मृत झालेल्या मतदारांची नावे वगळणे, नव्या ठिकाणी नमूद करणे, अशा प्रकारची मोहीम राबविली जात आहे. यामध्ये मोठ्या संख्येने नोंदणी व्हावी. यासाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांनी गतीशील अभियान राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील रामटेक परिसरातील मतदार नोंदणी कमी असल्याबाबत त्यांनी विचारणा केली. या भागातील दुर्गम परिसरात कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवावी, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. बदललेले पत्ते व त्या जागी मतदार नसणे यासंदर्भात पोस्ट खात्याच्या मदतीने अभियान राबविणे सुरू आहे. पोस्ट खात्याने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच पोस्ट खात्याच्या अभिप्रायानंतरही निवडणूक कर्मचाऱ्यांनी खातरजमा करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
महिला, पुरुष तसेच तृतीयपंथी यांच्या नोंदीबाबत जिल्ह्यात सुरू असलेल्या अभियानाचा देखील त्यांनी आढावा घेतला. अभियानातील महिन्याचे शेवटचे दिवस बाकी असून यामध्ये कोणताही कसूर राहणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कामगार ज्या भागात अधिक आहेत अशा औद्योगिक परिसरात कोणत्या पद्धतीची मोहीम सुरू आहे, याचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राची सुसूत्रीकरण, प्रमाणीकरण, प्रलंबित दावे, हरकती निकाली काढणे,मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची संदर्भात घेण्यात आलेला पुढाकार, जन्म व मृत्यू निबंधक यांच्याकडून मयत मतदारांची यादी प्राप्त करून घेण्याबाबत झालेली कारवाई, मतदार यादीतील तांत्रिक चुका, तसेच मतदान अभियानात राबविण्यात आलेल्या प्रसिद्धी मोहिमेचा देखील आढावा घेतला.
नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी मतदानाच्या वेळी आपली नावे नसल्याबाबत नाराजी व्यक्त करणे रास्त आहे मात्र अशा अभियानात सहभागी होणे देखील राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे या देशाचे सजग नागरिक म्हणून या अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे. सुशिक्षित युवकांनी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला मतदार झाला अथवा नाही याबाबत विचारणा करून प्रशासनासोबत काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
30 नोव्हेंबर 2021 पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे मतदार फॉर्म क्रमांक सहा भरून नवीन नावे पुन्हा दाखल करू शकतात. फॉर्म नंबर 7 भरून यातील मयत, स्थानांतरित यांची नावे मतदार यादीतून वगळून शकतात. तसेच फॉर्म नंबर 8 भरून मतदार यादीतील लिंग, नाव, वय याबाबतच्या चुका दुरुस्त देखील होऊ शकतात. तसेच फॉर्म क्रमांक आठ अ भरून त्याच मतदारसंघातील एका भागातून दुसर्या भागामध्ये नावे स्थलांतरित केल्या जाऊ शकतात. तसेच एनव्हीएसपी डॉट इन या वेबसाईटवर मतदार ऑनलाईन देखील हे सर्व प्रकारचे फॉर्म भरू शकतात. भारत निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाइन नावाचे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. सदर ॲप डाऊनलोड करून त्यावरूनही सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरता येतात. तरी सर्व मतदारांनी व नागरिकांनी व सर्व इच्छुक उमेदवारांनी सदर यादी तपासून आपल्या हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.