Big9news Network
जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस पडला आहे.आज जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीतीरावरच्या गावांत पाणी शिरले. काही गावांत ग्रामस्थ अडकून पडले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने ग्रामस्थांच्या बचावाचे कार्य सुरु केले. त्याच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने एन.डी.आर.एफ.च्या टीमची मागणी केली त्याही टीमने पूरग्रस्तांच्या बचावाचे काम करुन 16 जणांचा बचाव करुन सुरक्षित स्थळी हलविले तर जिल्ह्यातील 459 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले.
मांजरा धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये सतत झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाचे सर्व दरवाजे दि.27 सप्टेंबर 2021 रोजी उघण्यात आले. त्यामुळे धरणाखालील गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यातील वाकडीवाडी येथे तीन कुटुंबातील एकूण 20 व्यक्ती शेतातील घरामध्ये अडकली होती. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्या सर्वांची सुटका केली आहे. तेरणा नदीकाठी असलेल्या तेर,रामवाडी, इर्ला आणि दाऊतपूर या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना शाळेमध्ये आणि इतर सुरक्षित ठिकाणी प्रशासनामार्फत हलवले आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हेलिकॉप्टर पाठविण्याची मागणी केल्यानुसार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दाऊतपूर येथील शेतामध्ये अडकून पडलेल्या सहा व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यात चार मोठ्या माणसांचा तर दोन बालकांचा समावेश होता. तसेच कळंब तालुक्यातील सौंदणा येथील पुरामुळे अडकलेल्या 10 व्यक्तींना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची टीम आणि एक बोट तसेच एन.डी.आर.एफ. (NDRF) ची टीम तसेच तीन बोटीच्या माध्यमातून व हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करण्यात आली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील अंदाजे 125 लोक, इर्ला येथील अंदाजे 114 लोक, तेर येथील अंदाजे 35 लोक, दाऊतपूर येथील अंदाजे 90 लोक, बोरखेडा येथील अंदाजे 35 लोक, कामेगाव येथील अंदाजे 40 व्यक्तींना आणि वाकडीवाडी येथील 20 जणांसह अशाप्रकारे एकूण 439 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यात आज उस्मानाबाद तालुक्यातील सहा, तुळजापूर तालुक्यातील दोन, कळंब तालुक्यातील तीन तर उमरगा तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी 66.3,पाडोळी-81, केशेगाव-71, ढोकी-139.5, जागजी-123.8 तर तेर मंडळात 127.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-65.5, इटकळ-83.3, कळंब तालुक्यातील मोहा-66.3,शिराढोण-171, गोविंदपूर-107.5 तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात 69 मिलीमीटर पावसाची म्हणजे अतिवृष्टीची नोंद झाली.
जिल्ह्यात 27 आणि 28 सप्टेंबरच्या रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील 30 वर्षीय बालाजी वसंत कांबळे हे भंडारवाडी येथील पूलावरुन तोल जाऊन वाहून गेले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. जिल्ह्यात या अतिवृष्टीत 20 लहान आणि 17 मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. तर 180 झोपड्या-घरांची अंशत: पडझड झाली आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणा सतर्क आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रयत्नाने एन.डी.आर.एफ.ची टीम जिल्ह्यात वेळेत पोहचली. प्रथम एन.डी.आर.एफ.च्या 20 जवानांचे एक पथक वाहनाद्वारे आणि तीन बोटी घेऊन दाखल झाले. त्यांनतर हेलिकॉप्टरने आणखी एक टीम दाखल झाली. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि पट्टीच्या पोहणाऱ्या नागरिकांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, मांजरा आणि तेरणा पात्रालगतच्या सर्व गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Leave a Reply