रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात- पवारांच्या दिल्ली बैठकीची आ. पडळकर यांनी उडवली खिल्ली

Big9news Network

सोलापूर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजा- समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

शरद पवारांच्या दिल्लीतील बैठकीवरुन टीकास्त्र

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी खिल्ली उडवली.

ओबीसी उपमुख्यमंत्री का नाही?

ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यात जास्त आहे. धोक्याने जे सरकार आलं त्या सरकारमध्ये ओबीसी का उपमुख्यमंत्री झाला नाही? धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत, हे ओबीसी का समोर आले नाहीत? सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, असा हल्लाबोल पडळकरांनी केला