Big9news Network
स्मार्ट सिटी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यमुखी पडलेल्या पूर्वा अलकुंटे या ५ वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन मृताच्या नातेवाईकास २५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी संभाजी आरमाराने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे.
सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेली कामे म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. ही सुरु असलेली कामे निकृष्ट दर्जाची तर आहेतच मात्र सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता धोकादायक पद्धतीने सुरु आहेत. अशा बेजाबदार कामामुळे मागच्याच महिन्यात समर्थ भास्कर या १५ वर्षीय मुलाचा बळी गेला आहे. या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी स्मार्ट सिटी प्रशासन आणि त्यांचे ठेकेदार ताळ्यावर येतील अशी अपेक्षा होती. मात्र मागील घडलेल्या दुर्दैवी घटनेतून स्मार्ट सिटी प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. काल पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस दरम्यान खोदण्यात आलेल्या रस्त्यावरील डीपी धोकादायक स्थितीत उघडा ठेवण्यात आला आहे. या उघड्या डीपीला हात लागून पूर्वा अलकुंटे या ५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा अपघाती मृत्यू नसून स्मार्ट सिटी प्रशासन, संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाने झालेला खून आहे. योग्य ती खबरदारी घेतली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती. त्यामुळे या मृत्यूला सर्वस्वी स्मार्ट सिटी कंपनी आणि तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील आणि या कामाची मक्तेदार कंपनी हेच जबाबदार आहेत. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार धरून स्मार्ट सिटी कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्यावर आणि संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. मृत मुलीच्या नातेवाईकास २५ लाखांची आर्थिक मदत द्यावी. वारंवार सर्वसामान्य सोलापूरकरांच्या चिमुरड्यांचे बळी घेणाऱ्या बेजबाबदार लोकांवर कारवाई न झाल्यास मंगळवार दि. २/८/२०२१ पासून संभाजी आरमार आंदोलन हाती घेणार असून त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, विद्यार्थीप्रमुख सोमनाथ मस्के, कार्यालयप्रमुख सुधाकर करणकोट, संगप्पा म्याकल, राजू रच्चा, नागनाथ विटकर यांनी दिला आहे.