Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

 

महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५०% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या आज दि. १७.०३.२०२३ वार शुक्रवार पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत देण्यात येत आहे. सोशल मीडियावर बस कंडक्टर आणि प्रवासी महिला यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता. एक एप्रिल पासून ही सवलत मिळेल अशी चर्चा सुरू होती .परंतु, या चर्चेस आता विराम मिळाला आहे. आज शुक्रवारपासून ही सवलत देण्यात आलेली आहे.

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत देण्याचे निर्देश आज शुक्रवारी देण्यात आले आहेत.

या आहेत सूचना…

सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [ साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर बसेसमध्ये ५०% सवलत दि.आज शुक्रवार १७/०३/२०२३ पासुन मिळणार आहे.

सदरची सवलत ही भविष्यात परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहील. यामुळे भविष्यामध्ये नवीन येणाऱ्या बसेस मध्ये सवलत मिळेल का नाही हा वाद आता संपुष्टात आला आहे.

सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना ‘या नावाने संबोधण्यात येत आहे. सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे.

सदर सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही.

ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये.

सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.

सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.

सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.

मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही

महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या तिकीटांचे वसूली मूल्य ५० % राहिल. प्रवास केलेल्या महिलांची एकूण संख्या समजावी याकरिता प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)

सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय- ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे.

त्यासाठी रु. ५/-, रु.१०/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. १०/-, रु. २०/- रु. ३०/-, रु.४०/- रु.५०/- व रु.१००/- मुल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत. सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल.

७५ वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेनुसार १००% सवलत असेल.

६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत राहिल.

५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच ५०% सवलत असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *