Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर, प्रतिनिधी
जिल्ह्यातील 658 पैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून बार्शी तालुक्यातील वैराग व अक्कलकोट तालुक्यातील हंजगी वगळता उर्वरित 590 ग्रामपंचायतींसाठी तब्बल 12 हजार 225 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. सोमवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 8 हजार 455 इतक्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. वैराग येथे नगरपंचायत होणार असल्याने तेथे निवडणूक न लढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दुसरीकडे हंजगी येथे अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने तेथे आता फेरनिवडणूक अटळ आहे.
658 पैकी वैराग वगळता उर्वरित 657 ग्रामपंचायतींसाठी तब्बल 21 हजार 328 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत 296 उमेदवारी अर्ज नामंजूर झाले होते. दरम्यान, 8 हजार 455 जणांनी माघार घेतली आहे. 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर उर्वरित 590 ग्रामपंचायतींसाठी 12 हजार 225 उमेदवारांनी दंड थोपटले आहेत.
यासाठी 15 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून याची मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. कुठे दुरंगी, तिरंगी तर कुठे बहुरंगी लढती होत आहेत. यावेळी अनेक ठिकाणी बिनविरोधचे प्रयत्न झाले. त्याला काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आले. यामुळे गावात एकोपा वाढविण्याचा झालेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती व निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे.
मोहोळ- 63 ग्रामपंचायती 1409 उमेदवार, माढा- 74 ग्रामपंचायती 1394 उमेदवार, मंगळवेढा- 22 ग्रामपंचायती 461 उमेदवार, पंढरपूर- 71 ग्रामपंचायती 1657 उमेदवार, अक्कलकोट- 63 ग्रामपंचायती 1152 उमेदवार, करमाळा- 49 ग्रामपंचायती 884 उमेदवार, सांगोला- 56 ग्रामपंचायती 1330 उमेदवार, दक्षिण सोलापूर- 46 ग्रामपंचायती 975 उमेदवार, उत्तर सोलापूर- 22 ग्रामपंचायती 484 उमेदवार, माळशिरस- 45 ग्रामपंचायती 1003 उमेदवार, बार्शी- 78 ग्रामपंचायती 1476 उमेदवार. एकूण 590 ग्रामपंचायती 12 हजार 225 उमेदवार.

चौकट
तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायती
मोहोळ- अनगर/कोंबडवाडी, बिटले, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी (अ), सिद्धेवाडी, तेलंगवाडी, पासलेवाडी/गलंदवाडी, नालबंदवाडी, वाघोली/वाडी, वडवळ, शिरापूर (मो), पीरटाकळी, आढेगाव.
माढा- सापटणे भोसे, खैराव, धानोरे, फुटजवळगाव, वडाचीवाडी तम, महातपूर, जामगाव व निमगाव टें.
मंगळवेढा- मुढवी.
पंढरपूर- जैनवाडी.
अक्कलकोट- हंद्राळ, मातनहळ्ळी, नागनहळ्ळी, आंदेवाडी बुद्रुक, शिरशी, कुमठे, तोळणूर, उडगी, बणजगोळ.
करमाळा- जेऊरवाडी, सालसे.
सांगोला- मेथोडे, वाटंबरे, चोपडी, तिप्पेहळी, गायगव्हाण.
दक्षिण सोलापूर- लिंबीचिंचोळी, बोरामणी, संगदरी, तीर्थ, दिंडूर, बाळगी.
उत्तर सोलापूर- पडसाळी, पाथरी.
माळशिरस- गोरडवाडी, मिरे, बाभूळगाव, गिरझणी
बार्शी- 16 गावे
आदी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *