मंदिरातील दिवाळीच्या पहाटगाण्याने भाविक श्रोते मंत्रमुग्ध

Big9news Network

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दीपावली निमित्त सुमधुर पहाटगाण्यांचा स्वराविष्कार संपन्न झाला. संगीत अलंकार मनोहर देगावकर व  सहकारयांच्या वतीने सादर झालेल्या भक्तीमय पहाट गाण्यांच्या श्रवणाने उपस्थित भाविक श्रोते मंत्रमुग्ध झाले. लक्ष दीपांच्या प्रज्वलनाने दीपावलीचे आसमंत प्रज्वलित होत असताना वटवृक्ष मंदिरात प्रभात समयी गायक मनोहर देगावकर व सहकाऱ्यांच्या विविध रागांमध्ये ख्याल गायन व भक्तीगीत गायनांचा स्वराभिषेक स्वामींच्या चरणी अर्पण करण्यात आला.

लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या दीपावलीच्या प्रभातसमयी व संध्या मुहूर्तावर नित्यपणे गायनसेवेचा कार्यक्रम भक्तीभावाने संपन्न झाला. लक्ष्मीपूजन रोजी पाचला आता जागवा विठ्ठला या भाव जागृतीने सुरुवात झालेल्या गायन कार्यक्रमात भैरव राग प्रकारातील अहिर भैरव, वैरागी भैरव तथा विविध रागांचे व ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, बोलावा विठठल पाहावा विट्ठल, बारे स्वामीराया भेट केंव्हा देसी, भेटी लागी जीवा लागली से आस आदींसह विविध तालातील भक्तीगीते सादर करून भाविक श्रोत्यांना भक्ती रसाची अलौकिक भक्तीची अनुभूती अनुभवून दिली. या गायन सेवेत त्यांना संतोष देगावकर,  हार्मोनियमवर मनोजकुमार लच्याणकर, तर तबल्यावर आनंद पाटील, कैलास नखाते यांनी साथ संगत केली.

याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, स्वामीनाथ लोणारी, विपुल जाधव, अविनाश क्षीरसागर, सचिन हन्नुरे, महादेव तेली, गिरीश पवार, सागर गोंडाळ, महेश काटकर, आदींसह अनेक उपस्थित भाविकांनी या पहाटगाणी श्रावणाचा लाभ घेतला.

वटवृक्ष मंदिरात दीपावली पहाटगाणी सादर करताना मनोहर देगावकर व सहकारी दिसत आहेत. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांची कार्यक्रमास उपस्थिती