सोलापूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात उद्यापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरु होत आहे. या टप्प्यात नागरिकांचे तपासणी करुन आरोग्याबाबतची अचूक माहिती मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंद केली जाईल. याची खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणी बाबतच्या नियोजनासंदर्भात आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बैठक घेतली. त्याबैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते. शासकीय विश्रामधाम येथे ही बैठक झाली.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहचून सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये बहुतांश नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून जिल्हा प्रशासनाकडे माहितीचा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र पहिल्या टप्प्यात सर्व्हेक्षण करताना काही आरोग्य पथकांकडून किरकोळ उणिवा राहिल्या आहेत. या उणिवा दुसऱ्या टप्प्यात दूर करण्यासाठी आरोग्य पथकातील आशा सेविका आणि स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, “माझे कुटंब माझी जबाबदारी मोहिम आणि कोरोना विषयक इतर कामकाज करण्यासाठी शिक्षकांच्या सेवा घ्याव्यात. जे शिक्षक कोरोना विषयक कामकाज करण्यास नकार देतील त्यांच्या विनावेतन रजा मांडण्यात याव्यात. याबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी ”.
श्रीमती पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात स्वयंसेवक नियुक्त करताना स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी. स्वयंसेवकांना मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये माहिती कशा प्रकारे भरावी याबाबत प्रशिक्षण द्यावे. मोहिमेचा दुसरा टप्पा दहा दिवसाचा असल्यामुळे एका दिवसात एका पथकाकडून किमान 75 घरांचा सर्व्हेक्षण होणे अपेक्षित आहे. घरातील सर्व व्यक्तींची तपासणी होण्यासाठी सर्व्हेक्षण सकाळी लवकर किंवा सायंकाळी करण्याचे नियोजन करावे, असे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी तपासणी वेळी कोमॉर्बिड रुग्णांची माहिती स्वतंत्रपणे संकलित करावी. सर्व्हेक्षणावेळी कुटुंबातील व्यक्तींबाबत जास्तीत जास्त वस्तुस्थितीदर्शक माहिती नोंदविण्यास प्रयत्न करावा. असे सांगितले.
बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सोनिया बागडे, उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, शमा पवार-ढोक, हेमंत निकम, दिपक शिंदे, सचिन ढोले, तहसिलदार जयवंत पाटील, डॉ.ज्योती वाघमारे, योगेश खरमाटे आदी उपस्थित होते.
Leave a Reply