सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य प्रत्येक मानवासाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचे आयुष्य ग्रंथरूपाने प्रत्येक घराघरात वाचले जाते. परंतु अलीकडच्या काळातील गरज लक्षात घेत तसेच वाचनाची कमी झालेली आवड लक्षात घेऊन बाबासाहेबांचे आयुष्य ऑडिओ स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. फुले, शाहू, आंबेडकर विदवत सभा यांच्या सहकार्य आणि पाठपुराव्यातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात बाबासाहेबांचे चरित्र आणि त्यांची लिखित पुस्तके ऑडिओच्या माध्यमातून ऐकता येणार आहे. येत्या २५ ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या श्रवण ग्रंथालयात एकूण पाच हेडफोन असतील. एका वेळेस पाच लोकांना ही पुस्तके ऐकता येतील. या ग्रंथालयात ऑडिओ सिस्टिम बसवण्यात आली आहे. वाचनालयाच्या वेळेत याचा लाभ घेता येणार आहे.
भारतीय संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म, शूद्र पूर्वी कोण होते?, क्रांती-प्रतिक्रांती, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा परामर्श, युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सहा पुस्तके ऑडिओ स्वरूपात ऐकता येणार आहेत. सोलापूर आकाशवाणीचे नैमित्तिक निवेदक नितीन बनसोडे, प्राध्यापिका अंजनाताई गायकवाड आणि सुधीर चंदनशिवे यांच्या आवाजात ही पुस्तके ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत.
सामाजिक कार्यकर्ते राजरत्न फडतरे (आर्किटेक्ट)
या उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाले की, “लॉकडाऊन झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील वाचनालयात मी पुस्तके वाचण्यासाठी येत होतो. येथे केवळ वर्तमानपत्र वाचले जायचे, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा ऑडिओ स्वरूपात ऐकवली जाऊ शकते, असा विचार माझ्या मनात आला. सोलापूर महानगरपालिकेला यासंदर्भात कल्पना दिली. हा उपक्रम सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने मोठे सहकार्य केले आहे.”
या ऑडिओ लायब्ररीच्या माध्यमांतून भगवान बुद्ध, फुले, शाहू , आंबेडकर साहित्य मोफत ऐकावयास मिळणार आहे. साहित्याव्दारे आकलन व अभ्यास करता येणार आहे. तरी सोलापूरातील सर्व जनतेने, विद्यार्थी व विद्यार्थीनीने या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिओ लायब्ररीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच होतोय असा उपक्रम
राजरत्न फडतरे म्हणाले, या डिजिटल युगात वाचनाची गोडी नाहीशी होत आहे. म्हणून डिजिटल माध्यमांचा उपयोग करत ही नवी संकल्पना आणली आहे. या ग्रंथालयात छोट्या स्वरूपात सुरू केलेला हा उपक्रम संस्काराचे आणि चळवळीचे केंद्र बनावे यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. असा उपक्रम बहुदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असावा.
Leave a Reply