एम.के.फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळाचे वाटप

सोलापूर : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी शहरातील सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती सरसावल्या आहेत. गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनणार आहे.

शहरातील एम.के. फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त ‘खुशियो के पल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या दिवाळीसणासाठी लागणार्‍या किराणा मालाचे वाटप करण्यात येणार आहे. मैदा, तेल, बेसन, साखर, चुरमुरे, शेंगा, फुटाणे, खोबरे, रवा, तिखट मसाला, उटणे, साबण,पणती या किराणा मालाचे किट देण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे. संस्थेने माणुसकीचे दर्शन घडविल्यामुळे आता श्रमिकांची दिवाळी उजळणार आहेत.

शहरामध्ये अश्या अनेक महिल्या आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह दुसऱ्यांच्या घरात धुणी-भांडी करून होत असते. त्यांच हातावर पोट आहे. पण लॉकडाऊनच्या कालखंडात या महिला विस्थापित झाल्या. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून घर मालकांनी त्यांना कामावरून काढून टाकले. परिणामी त्यांच्या हातातून काम गेले. घर उघड्यावर आले. सणासुदीच्या कालखंडात सुद्धा या महिला अनेक अडचणींना तोंड देत असल्याचे दिसून आले.

पैशांअभावी दिवाळी सण साजरा करण्यात त्यांना अडचणी येऊ नयेत, त्यांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या घरात आनंद नांदावा, यासाठी श्रमिक महिला कामगारांना फराळासाठी लागणार्‍या किराणा किट वाटप करणार आहे, अशी माहिती एम. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा मध्य रेल्वे सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य महादेव कोगनुरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक नीलकंठय्या स्वामी, अजित पाटील, मल्लिकार्जुन दारफळे, महादेव सगरे, भैरप्पा कोणदे, मल्लिकार्जुन बगले, नागेंद्र कोगनुरे, शिवाजी राठोड, महांतेश बगले, सागर मादगुंडी आदी परिश्रम घेत आहेत.

प्रत्येकाची व्हावी दिवाळी गोड 
कोरोनामुळे हाताला काम नसल्याने आर्थिक परिस्थिती अनेकांची खालावली आहे. त्यामुळे घरात रोजचे जेवणदेखील व्यवस्थित मिळत नाही. अशांच्या घरात दिवाळीच्या वेळेस गोडधोड अन्नपदार्थ कुठून येणार, असा प्रश्न अनेकांच्यासमोर अाहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून गरीब, गरजू कुटुंबीयांना फराळ व साहित्य देऊन दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एम. के. फाऊंडेशनतर्फे पहिल्यांदाच असा समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येत आहे

महादेव कोगनुरे
अध्यक्ष-एम. के.फाऊंडेशन