सोलापुरात बॅडमिंटन,जलतरण खेळास परवानगी

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश केले जारी

            सोलापूर,दि.05:  बंदीस्त जागेतील (इनडोअर गेम्स) जलतरण, बॅडमिंटन, स्क्वॅश, नेमबाजी इत्यादी खेळांना आजपासून परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले.

            जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनामध्ये काही बदल केले आहेत. त्यानूसार 14 ऑक्टोबर 2020 चे प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवून त्यामध्ये सुधारीत सूचनानुसार काही मुद्यांचा समावेश करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. आदेशात नमुद केले आहे की, प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्राबाहेरील जलतरण तलाव, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जांच्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी वापरता येतील. याबाबतच्या मानक कार्यपद्धती (स्टॅडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून देण्यात येतील. योग शिक्षण देणाऱ्या संस्थांना नियमित कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मानक कार्यपद्धतीचा अवलंब करणे अपेक्षित आहे.

            प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्राबाहेरील सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स यांना 50टक्के बैठक व्यवस्थेच्या मर्यादेत परवानगी देण्यात येत आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती सांस्कृतिक कार्यविभाग आणि स्थानिक प्राधिकरण निश्चित करतील. मात्र या सर्व बाबतीत कोविड-19 बाबतच्या यापुर्वीच्या आदेशातील सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अशा व्यक्ती ,संस्था, संघटना विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे.