अचानक साक्षात्कार ; धनंजय मुंडे विरोधातील बलात्काराची तक्रार मागे

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.

कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

दरम्यान, रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.