सोलापूर,दि.24 : बनावट नोटा देऊन फसवणूक करण्याचे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात वाढले आहे. शेतकऱ्याला बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
मोडनिंब येथे बनावट नोटा देऊन शेतकऱ्याची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोडनिंब येथील आठवडी बाजारात बनावट नोटा देऊन शेळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी मोडनिंब पोलिसांनी सिद्धेश्वर कैचे या आरोपीला त्याच्या साथीदारासह ताब्यात घेतलं आहे. मोहोळ येथील बकऱ्यांच्या आठवडा बाजारात शेतकऱ्यांना नकली नोटा देऊन केलेली फसवणूक ताजी असतानाच सदरची घटना शनिवारी मोडनिंब येथेही घडली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपीकडून 67 हजार रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. यामध्ये दोन हजार रुपयाच्या आणि पाचशे रुपयाच्या बनावट नोटा आहेत. आरोपीकडे या नोटा कोठून आल्या याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील शेतकरी कुंडलिक लेंगरे हे शेतकरी आपल्या दोन मेंढ्या व सहा बकरी घेऊन मोडनिंब बाजारात विक्रीसाठी बसले होते. त्यावेळी सिद्धेश्वर कैचे या तरुणाने 40 हजार रुपयाला लेंगरे यांच्याकडील आठ बकऱ्यांचा व्यवहार ठरवला. ही रक्कम देताना त्याने शेतकऱ्याला बनावट नोटा दिल्या. शेतकऱ्याने या नोटा खऱ्या नसल्याचे सांगताच या तरुणाने तेथून धूम ठोकली.
बनावट नोटा देऊन शेतकऱ्याच्या बकऱ्या मोहोळकडे घेऊन जात असताना असताना शेटफळ जवळ सदरची गाडी पकडण्यात आली आणि दोन्ही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीकडून 67 हजाराच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या आहेत. या बनावट नोटा बनवणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
Leave a Reply