मोहोळ |२५ ऑक्सिजन बेडची त्वरित सुविधा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे

मोहोळ तालुक्यासाठी २५ ऑक्सिजन बेडची त्वरित सुविधा
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर, दि. २४: मोहोळ तालुक्यात कोरोना रूग्ण
झपाट्याने वाढत आहेत. तालुक्यात अद्याप ऑक्सिजन बेड उपलब्ध नव्हते, १ मेपासून समाज कल्याणच्या वसतिगृहात ऑक्सिजनचे २५ बेड आणि इतर ७५ बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

मोहोळ येथे कोविड१९ संबंधित उपाययोजना आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पंचायत समितीचे सभापती रत्नमाला पोतदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, गटविकास अधिकारी भास्कर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर, लसीकरण समन्वयक डॉ अनिरुद्ध पिंपळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, तालुक्यातील रुग्णांच्या सोयीसाठी दोन खाजगी संजीवनी आणि गावडे हॉस्पिटलमध्ये डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलची मान्यता देण्यात आली. आणखी नऊ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्याचे प्रस्तावित असून याठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देणे गरजेचे नाही, हे रुग्णाला आणि जनतेला डॉक्टरांनी पटवून द्यायला हवे. गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देणे गरजेचे आहे. आज १५ हजार लस उपलब्ध झाली असून लसीचे योग्य नियोजन करा, गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिसांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.

शेटफळ येथील ट्रामा केअर सेंटरसाठी आवश्यक आरोग्य सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध कराव्यात. नवीन निर्माण करण्यात येणाऱ्या डेडीकेडटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

श्री. स्वामी म्हणाले, लसीचे नियोजन करण्यात आले असून यंत्रणेमार्फत १८ वर्षावरील सर्वांची नोंदणी ग्रामस्तरावर करून ज्या तारखेला लसीकरण त्यावेळेस बोलावले जाणार आहे. ४५ वर्षावरील आणि दुसऱ्या डोससाठी काही लसीकरण बूथ राखीव ठेवण्यात येणार आहेत.

यावेळी गटविकास अधिकारी श्री मोरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाथरूडकर यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी तालुक्यात करण्यात आलेल्या उपाययोजनाची माहिती दिली.