पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

पंढरपूर, दि. २३: कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंढरपूर विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार यशवंत माने, प्रशांत परिचारक, कल्याण काळे, भगिरथ भालके आदी उपस्थित होते.

पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीत शंभर बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सुविधा खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याचबरोबर डीव्हीपी उद्योग समूहातर्फे अभिजीत पाटील यांचे पन्नास बेड, पडळकर हॉस्पिटलमध्ये तीस आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तीस बेडची क्षमता वाढवली जाणार आहे.

पंढरपूरला सध्या पासष्ट एकर परिसरात आणि गजानन महाराज मठात कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आली आहेत. याचबरोबरीने मोठ्या ग्रामपंचायतींना मंजुरी दिली जावी, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या.

ब्रेक द चेनच्या मोहिमेत पोलीस विभागाने लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करावी. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले उपस्थित होते.