आजीच्या प्रेरणेने नातवंडांचा नेत्रदानाचा संकल्प ; एकाच दिवशी तीन पिढ्यांनी निर्माण केला आदर्श.

आज १० जून , जागतिक दृष्टीदान दिवस जगातील लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारा दिवस. मानवी शरीरामध्ये डोळे किती महत्त्वाचे असतात याबद्दल अनेक वर्णने आपण पाहिलेली आहेत.परंतु,असंख्य जण असे आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये डोळे नसल्यामुळे काळोख पसरलेला असतो.त्यावर मात करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था अनेक कार्यकर्ते दिवस-रात्र प्रयत्न करत असतात.

सोलापुरात सुद्धा मरणोत्तर दृष्टीदान संकल्प करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश म्हणून आज जागतिक दृष्टिदान दिवसाचे औचित्य साधून एका आजीबाईच्या प्रेरणेने नातवंडांनी नेत्रदानाचा संकल्प केला.

सोलापुरातील समाचार चौक येथील रहिवासी व विश्वसमाचारचे मालक व विश्वस्त श्री दत्तात्रय उर्फ त्रिभुवन जक्कल यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई जक्कल ,वय वर्षे ८८ यांनी आज जागतिक दृष्टीदानाच्या दिवशी नेत्रदानाचा संकल्प केला.

त्यासाठीचे आवश्यक संकल्पपत्र भरुन देहांगदान समाजसेवी संस्था, सोलापुर व दधिची अवयवदान प्रचारक संघ, सोलापुर या संस्थेचे कार्यकर्ते श्री उदयराज आळंदकर व श्री योगिन गुर्जर यांच्या कडे सुपुर्द केला.

आजींनी संकल्प पत्र भरल्यावर मुलगा, मुलगी ,सुन व दोन्ही नातवंडांना सुद्धा नेत्रदानासाठी तयार केले.
त्यांच्या विनंतीला मान देऊन समस्त जक्कल कुटुंबियांनी सुद्धा नेत्रदान संकल्प पत्र भरले.

तीन पिढ्यांनी एकाच वेळी केला नेत्रदानाचा संकल्प

एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकाच वेळी नेत्रदानाचा संकल्प केला ही सोलापुरातील पहिलीच घटना असावी.दोन्ही संस्थेतर्फे जक्कल कुटुंबाचे आभार व्यक्त केले.आपणही नेत्रदानाचा संकल्प करुन संकल्पपत्र भरु शकता. यासाठी देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था, सोलापूर यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

●दधिची अवयवदान प्रचारक संघ, सोलापुर.
●संपर्क:- श्री आळंदकर 983029829
●श्री गुर्जर 8208212088