रेमडेसिवीर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार

Big9news Network

शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने हे इंजेक्शन आणि इतर तत्सम औषधे आजपासून खुल्या बाजारात उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

 त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार 11 एप्रिल 2021 पासून रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाद्वारे केले जात होते. मात्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांच्या पत्रानुसार इंजेक्शन व इतर तत्सम ओषधे खुल्या बाजारात उपलब्ध करण्यात येत आहेत. ज्या रुग्णालयांना अथवा रुग्णांना औषधाची गरज भासेल त्यांनी घाऊक अथवा किरकोळ औषध विक्रेत्यांशी संपर्क साधावा. यापुढे इंजेक्शन आणि तत्सम औषधे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित केली जाणार नाहीत. मात्र कोविड-19 ची जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा रेमडेसिवीर इंजेक्शन इतर औषधे नियंत्रणात घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर औषधे वाजवी दरात न मिळाल्यास किंवा जादा दर आकारल्यास अथवा अन्य तक्रारीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर ( 0217-2310745)  किंवा सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, सोलापूर ( 0217-2726572) यांच्याशी संपर्क साधावा.