आता..जुळे सोलापूर महानगरपालिका | शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी आणि व्यापक जनआंदोलनाची गरज

शासकीय विश्रामगृह झालेल्या कृती समितीच्या बैठकीत जनतेच्या भावना व्यक्त

 

सोलापूर महानगरपालिकेला कर स्वरूपात सर्वाधिक महसूल उत्पन्न देऊनही मुलभुत नागरी सोयी सुविधा मिळवण्या करिता येथील नागरिकांना अनेक दशकांपासून कष्ट सोसावे लागत असून आता त्याचा उद्रेक होऊन येणाऱ्या जुळे सोलापूर महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी व्यापक जनआंदोलनाची करण्याची गरज असल्याचे होटगी रोड सोशल फाऊंडेशनचे सचिव सचिन चौधरी यांनी त्यांच्या स्वागतपर मनोगतात व्यक्त केले. महाराष्ट्र मुन्सीपल कौन्सिल, नगर पंचायत अँड इंडस्ट्रीयल टॉऊनशिप अॅक्ट १९६५ प्रमाणे तीन लाख लोकसंख्या असलेल्या भागास महानगरपालिका दर्जा प्राप्त होऊ शकतो, त्याकरिता सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला तात्काळ प्रस्ताव पाठववुन प्राथमिक प्रारुप रचना तयार करावे अश्या सूचना जुळे सोलापूर हद्दवाढ भाग कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेने सतत पाठपुरावा ह्या करिता सुरू असून जनभावनांचा विचार केला तर हद्दवाढ भागासहित जुळे सोलापूर महानगरपालिका सहज अस्तित्वात येऊ शकते असे मत गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी केले.

मुंबई आणि उपनगरात एकुण सहा महानगरपालिका, पुण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी सर्व स्थारातुन व्यापक प्रयत्न झाल्यामुळे आज ह्या सर्व महानगरपालिका अस्तित्वात आल्या अशी मांडणी अनंत कुलकर्णी यांनी केली. नुकतेच पुण्यातील हिंजवडी सह सहा गावांसाठी स्वतंत्र हिंजवडी महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी सर्व स्थारातुन पुढाकार घेण्यात आला असून लवकरच नगरविकास विभाग ह्याबाबत हरकतीची अधिसूचना जाहिर करेल अशी प्राथमिक माहिती आम्हाला समजली असून हद्दवाढ भागासहित जुळे सोलापूर महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी देखील अश्याच प्रकारे जिल्हा प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे अशी भुमिका वेक अप सोलापूर फौंडेशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी मांडली.

सदर बैठकीत हद्दवाढ भागासहित जुळे सोलापूर महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी सर्व स्थारातुन प्रयत्न होणे, एअरपोर्टच्या धर्तीवर जुळे सोलापूर स्थानक बस पोर्ट म्हणून विकसित करणे, आसरा पुला जवळील बाजुस नवीन रेल्वेचे स्थानक निर्माण करुन सोलापूरवरुन सुटणार्‍या गाड्यांचे नियोजन इथुन करणे तथा विविध गाड्यांना लघु थांबा देणे, जुळे सोलापूर आणि हद्द वाढ भागात मुलभुत नागरी सुविधांची कैक वर्षांपासूनची वणवा दुर करणे, स्मार्ट सिटी मध्ये जुळे सोलापूरचा समावेश करुन घेणे, सोलापूर शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उजणीच्या दुहेरी जलवाहिनीचे कार्य तात्काळ प्रारंभ करणे, हैद्राबादच्या धर्तीवर सोलापूरातुन सर्व प्रमुख महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेसाठी रिंग रोडचे काम एन. एच.ए.आय. कडुन करुन घेणे, शहराच्या सार्वजनिक वाहतूकीसाठी परिवहन बस सेवा सुधारणा करणे आणि नागरीकांना प्रोत्साहन देणे.

नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही प्रशासकीय अडचण निर्माण होऊ न देणे, जुळे सोलापूरात आय.टि.पार्क निर्माण करण्यासाठी व्यापक तरतुदी जसे जमीन, वीजपुरवठा, इंटरनेट कनेक्शन आणि प्रशासकीय परवानग्या मध्ये भरिव सुट देणे, सोलापूरच्या रामवाडी परिसरातील शासनाच्या मालकीच्या जागेत अॉलिम्पिक स्टँडर्डचे सर्व खेळांचे भव्य शासकीय स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटरची निर्मिती करणे, जुळे सोलापूरच्या वैभवात भर टाळण्यासाठी संस्कृतीक नाट्य मंदिर, चित्रपट गृह, मॉल्स आदींना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे, ह्या मुद्द्यांवर व्यापक विचारमंथन झाले.जुळे सोलापूर हद्दवाढ भाग कृती समितीच्या वतीने शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मिलिंद भोसले, सचिन चौधरी, विजय कुंदन जाधव, अनंत कुलकर्णी, आनंद पाटील, निरंजन कलबुर्गी, सुजित कोरे, किसन रिकीबे, सुहास भोसले, प्रसन्न नाझरे, कैलास लांडे, इक्बाल हुंडेकरी, चंद्रकांत ईश्वरकट्टी, भारत पाटील, प्रसाद गोटे, बाळासाहेब मोरे, संदीप फुलारी, डॉ.राजीव मोहोळकर, प्रकाशनाना नागणसुरे, सुधीर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते