पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृध्दापकाळाने आज दि. १५/११/२०२१ ला सकाळी ०५.०७ मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी 7.30 वाजता त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील. अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा नुकताच शंभरावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. काल रविवारी बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली होती. आज सोमवारी सकाळी पुरंदरे यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला होता.
पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.
बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.