नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे शाश्वत विकास साधा!
सोलापूर विद्यापीठात डॉ. पाटणकर यांचे व्याख्यान
सोलापूर, दि.25 शिक्षण हे प्रगतीचे माध्यम असून संशोधनाशिवाय विकास अशक्य आहे. नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे शाश्वत विकास साधून बलशाली भारत घडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अभ्यास व संशोधकांनी योगदान द्यावे, असे आवाहन राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन (आरजीएसटीसी) यांच्यातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि पोस्टर व मॉडेल्स आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात या अंतर्गत डॉ. अजित पाटणकर यांचे ‘सिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या विषयावर व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील यांनी विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांचा परिचय डॉ. डी. वाय. नादरगी यांनी करून दिला.
डॉ. पाटणकर म्हणाले की, संशोधन हे फार महत्त्वाचे आहे. संशोधनाशिवाय कोणतीही नवी गोष्ट, नवा शोध लागणार नाही. ज्यावेळी आपण संशोधन करतो, त्यावेळी नव-नवीन गोष्टींचा शोध लागतो आणि तेथून विकास सुरू होतो. यामुळे समाजाला व देशाला उपयुक्त असे नवसंशोधन करून त्याची गुणवत्ता कशी वाढवता येते, यावर अभ्यासक व संशोधकांनी भर देणे आवश्यक आहे. ‘कोविड-19 विषाणू’ गंभीर असून त्यामुळे देशातील व जगातील अभ्यासक व संशोधकांना शिकण्यासाठी खूप काही मिळाले. नवीन गोष्टींचा शोध लागला, लसींची निर्मिती झाली. खूप काही नव्या गोष्टींचा उदय या काळामध्ये झाला. ही एक सकारात्मक बाजू शिकण्यासारखी आहे. यासाठी शिक्षण आणि समाजाशी असलेली कनेक्टिविटी ही फार महत्त्वाची आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच प्रगती होत असते. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी लक्ष देणे आवश्यक आहे. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन आणि बाबा अनुसंधान केंद्र यांच्यातर्फे विविध प्रोजेक्ट, उपक्रम राबवले जातात. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आणि प्रगती साधावी, त्यातून नवसंशोधन निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही डॉ. पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, समाज व देशाच्या विकासासाठी संशोधन वाढले पाहिजे. त्यासाठी प्रचंड मेहनतीने शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व संशोधकांनी काम करणे आवश्यक आहे. संशोधन वाढविण्यासाठी व नवंसंशोधकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून भाभा अनुसंधान केंद्र यांच्याशी विविध 13 प्रोजेक्टकरिता सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अभ्यासक व संशोधकांना एक प्रकारची सुवर्णसंधी आहे. आकृती प्रोजेक्टच्या माध्यमातून संशोधनासाठी प्रोत्साहित करण्यात येते. हे सर्व युनिक प्रोजेक्ट असून त्यासंदर्भात अभ्यास, शिक्षक व संशोधकांनी त्याची संकल्पना समजून घेऊन त्याविषयी कार्य करावे आणि नवसंशोधन निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी केले.
हा कार्यक्रम ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पार पडला. विद्यापीठातील सर्व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते. विविध स्पर्धेतील विजेत्यांना दुपारच्या सत्रात पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. एस. एन. शृंगारे यांनी मानले.