युक्रेनमधून जिल्ह्यातील चार मुली भारतात दाखल
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाची माहिती
सोलापूर, दि.२७ : युक्रेन या देशात अडकलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३१ विद्यार्थ्यांपैकी चार मुली आज भारतात सुखरूप दाखल झाल्या आहेत. या चौघीही आपापल्या नातेवाइकांकडे पोहोचल्या आहेत. याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून देण्यात आली.
भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे, याअंतर्गत सुप्रिया खटकाळे (मंगळवेढा), अंकिता अनिल शहापुरे आणि सलोनी गेंगाणे (दोघीही जुळे सोलापूर) या रात्री दिल्लीमध्ये उतरल्या होत्या. आज त्या पुणे विमानतळावर दाखल झाल्या असून नातेवाईक आणि त्यांची भेट झाली आहे.
ऋतुजा बाबासाहेब कबाडे (एखतपूर, ता. सांगोला) ही विद्यार्थिनी आज दुपारी मुंबईत पोहोचली असून तिचे वडील तिला घेण्यासाठी गेले आहेत.
उर्वरित विद्यार्थी सुद्धा उद्या किंवा परवा भारतात पोहोचणार आहेत, तेही सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.