सोलापूर व महाराष्ट्राच्या राजकारणात कॉंग्रेस पक्षाकडून सतत 12 वर्ष ज्यांनी आमदार म्हणून आपला ठसा उमटवला आणि अनेक महिला संस्थांची निर्मिती करून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अश्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे आत्मकथन ‘मी निर्मला ठोकळ’ हे पुस्तक गौरव पुस्तकालय तर्फे प्रकाशित करण्यात येत आहे. अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
एक करारी कर्तृत्ववान आणि प्रखर देशभक्त असणाऱ्या पित्याच्या पोटी जन्म घेतल्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाचे आणि समाजकारणाचे संस्कार निर्मलाताईवर झाले. साहजिकच त्या वाटेवरून जाताना पुढे आमदार झाल्या. अभ्यासपूर्ण भाषणांनी विधानसभा गाजवली. एक उच्चशिक्षित स्त्री शह-कटशहाच्या राजकारणातही आपल्या चौफेर कर्तृत्वाचा ठसा उमटवते, याचा लेखाजोखा या आत्मपर लेखनातून दिसून येतो. या निमित्ताने 1960 ते 1990 चा काळ महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जडणघडणीचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. एका बुद्धिमान, संवेदनशील व्यक्तिमत्वाचं हे लोभसवाण दर्शन वाचकांना नक्कीच पसंत पडेल.
रविवार, दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी निर्मलाताई ठोकळ यांच्या वाढदिवसादिवशी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रख्यात साहित्यिक डॉ. सुहास पुजारी यांच्या हस्ते आणि जेष्ठ साहित्यिका सुरेखाताई शहा यांच्या अध्यक्षतेखाली चंडक प्रशाला बाळे येथे सकाळी 09:30 वाजता संपन्न होणार आहे. अशी माहिती डॉ. नसीमा पठाण यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी आतकरे, नितीन अवताडे,
संदीप गाजरे, दत्तात्रय नामकर आदी उपस्थित होते.