Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

अमृत जवान अभियान 2022

देशाच्या सिमेचे रक्षण करत असताना सैनिकांना गावाकडील वैयक्तिक व कौटुंबिक कामांकडे
लक्ष देता येत नाही. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये माजी सैनिक, शहीद जवानांच्या
विधवा, सेवेत कार्यरत सैनिकांची कामे प्रलंबित राहतात. सैनिकांची सेवा व समर्पण विचारात घेता
सर्व सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी 1 मे ते 15 जून 2022 या
कालावधीत ‘अमृत जवान अभियान 2022’ संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. याविषयीचा
शासन निर्णय 13 एप्रिल 2022 रोजी निर्गमित झाला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

या अभियानाविषयीची माहिती…

राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये माजी सैनिक, शहीद जवानांच्या विधवा पत्नी
तसेच सेवेत कार्यरत सैनिकांच्या प्रलंबित कामांचा जलद निपटारा होण्यासाठी 1 मे ‘महाराष्ट्र दिनाचे’
औचित्य साधून 1 मे ते 15 जून 2022 या कालावधीत ‘अमृत जवान अभियान 2022’ संपूर्ण राज्यात
राबविण्यात येत आहे. सैनिक व त्यांच्या कुटूंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी हे अभियान उपयुक्त
ठरेल.

अभियानादरम्यान सोडविण्यात येणाऱ्या अडचणी

‘अमृत जवान अभियान’ हा उपक्रम जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी यापूर्वी राबविले असून
त्याच धर्तीवर संपूर्ण राज्यात आता राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे माजी सैनिक, जवान
विधवा, सेवेत कार्यरत सैनिकांच्या महसूल विभागाकडे प्रलंबित फेरफार, बिनशेती व बांधकाम
परवानगी, भूसंपादन व पुनर्वसन संबंधी अडचणी, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड इत्यादी कामांचा
जलद निपटारा करण्यात येईल. तसेच पोलीस विभागाकडे विविध तक्रारी/समस्या, समाजकंटकांकडून
त्रास होत असलेबाबत तक्रारी, जमीन/ जमिनींच्या हद्दी/ पाणी यावरुन होणारे फौजदारी स्वरुपाचे
वाद आदी कामांचा समावेश आहे.

ग्रामविकास विभागाकडील विविध योजनांचा लाभ, ग्रामपंचायत स्तरावरील स्तरावरील
रहिवास विषयक विविध बाबी तसेच कृषी विभागाकडील विविध योजनांचा लाभ देण्याकरिता
प्रस्ताव तयार करणे, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागाकडील परवाने तर अनेक
विभागांकडील अशा कामांसाठी विशेष मेळावे घेऊन या अभियानाद्वारे सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी
लावण्यात येणार आहेत.

तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीचे कामकाज

अमृत जवान सन्मान अभियान समन्वय समितीची तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर स्थापना
करण्यात येईल. तालुकास्तरीय समितीमध्ये उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष तर तहसीलदार सदस्य
सचिव असतील. तसेच जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर निवासी
उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील. तालुकास्तरीय समितीची बैठक 7 दिवसांतून किमान
एकदा होईल. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाच्या धर्तीवर ‘अमृत जवान सन्मान
दिन’ आयोजित करुन अडचणींचे निरसन करण्यात येणार आहे.
तालुका तसेच जिल्हास्तरावर हे अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना,या
कामकाजासाठी एक जबाबदार अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी नेमणूक, ‘अमृत जवान सन्मान दिन’
तहसील कार्यालयात घेण्यात येईल. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी कक्ष या तत्त्वाप्रमाणे
सहायता कक्ष स्थापन करुन या कक्षाच्या कामकाजासाठी एका स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात
येणार आहे. दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत विविध विभागाकडील तक्रार अर्ज स्विकारण्यात येतील.
या अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधीत विभागाकडून प्राप्त करुन घेऊन जिल्हाधिकारी
कार्यालयास अवगत करण्यात येईल. या अभियान काळात तक्रार निवारणाच्या अनुषंगाने संबंधित
अर्जदाराला मार्गदर्शन करण्यात येईल.
सैनिकांची सेवा व समर्पण विचारात घेता सर्व सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी हे अभियान
निश्चितच उपयुक्त ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *