सही करताना हात का थरथरतोय.? जवळपास चारशे मेडिकल बिले थकीत
एका बाजूला प्रयोगशील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दिलीप स्वामी यांची प्रतिमा निर्माण झाली आहे परंतु आरोग्य विभागातील लालफितीच्या कारभारावर त्यांनी अंकुश ठेवावा अशी मागणी जोर धरत आहे. जवळपास चारशे मेडिकल बिल थकीत असून त्यावर सही करताना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे हात का थरथरतात आहेत हा सवाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सीईओ दिलीप स्वामी यांनी चार्ज घेतल्यापासून जिल्हा परिषदेने कात टाकलीय.त्यांच्या उपक्रमशीलतेची दखल दस्तुरखुद्द ठाकरे सरकारने आणि सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबईतील अधिकारी वर्गाने घेतला आहे.
स्वामी सरांची शाळा राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे.दरम्यान ,आरोग्य विभाग यावर अंकुश ठेवण्यास ते कमी पडत असल्याची भावना अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होतेय.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचार्याचा संबंध हा आरोग्य विभागाशी येतो. त्यांच्या,कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासंदर्भात मेडिकल बील काढताना फाईल ‘जड’झाल्याशिवाय सही केली जात नाही. अशी तक्रार अनेकांनी केली आहे.
यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे काही संघटनांनी पत्रव्यवहारही केला होता, तरीही म्हणावा तसा फरक पडला नाही.
एकच टेबल एकच अधिकारी
डॉ. शीतलकुमार जाधव आणि जिल्हा परिषदेची नाळ चांगलीच जुळलेली आहे. आरोग्य अधिकारी आणि जाधव हे समीकरण फिक्स झाले आहे. मध्यंतरी महापालिकेत त्यांची बदली झाली होती परंतु कौशल्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांची खुर्ची त्यांच्याकडे आली.
एकाच पदावर एकच अधिकारी सेवा बजावत असल्याचे दिसून येत आहे.शहर, जिल्ह्यात तब्बल 18 वर्षे झाली त्यांची सेवा सुरू आहे.
माझ्याकडे काही कर्मचाऱ्यांच्या थकित मेडिकल बिल संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत. यासंदर्भात मी लेखी विचारणा केली असता तक्रारी निकाली काढण्यात आल्या अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली होती. अजूनही जवळपास 400 बिले पेंडिंग असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.शनिवारी यावर मिटिंग आयोजित करण्यात आली आहे.
दिलीप स्वामी ,मुख्य कार्यकारी अधिकारी