उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा; राज्यातील ‘या’ भागांत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता
———————————-
मुंबईः एप्रिलमधील उन्हाच्या तडाख्यानंतर मे महिन्यामध्ये बहुतांश वेळा ढगाळ वातावरणाचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. कोकण विभागात मे महिन्यामध्ये फारसे चढे कमाल तापमान आत्तापर्यंत नाही. येत्या चार ते पाच दिवसांमध्येही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भाच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये गुरुवारी हलक्या सरी किंवा मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये वातावरण कोरडे असले तरी अंशतः ढगाळ असेल, असा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये पावसाचा जोर शुक्रवारी कमी असेल तर रत्नागिरीमध्ये शनिवारी हा जोर कमी होईल. सिंधुदुर्गामध्ये शनिवारी आणि रविवारी मेघगर्जना किंवा हलक्या सरींची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात मे महिन्यातील पावसाची ही उपस्थिती शनिवारी कमी होऊ शकते. परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. मराठवाड्यातही शनिवारनंतर हळुहळू वारे, पाऊस याचा जोर कमी होऊ शकतो.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या काळात पावसाची शक्यता असताना विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवेल. गुरुवारी अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला येथे हा तडाखा अधिक असू शकतो. अमरावती आणि अकोला येथे रविवारपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
Leave a Reply