पुळूज हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील जमीनी बागायती असल्यामुळे समाजाचे जीवनमान सधन आहे.सोलापूर पासून तिऱ्हे मार्गे ४५ किमी अंतरावर हे गाव आहे. प्राचीन पुळई च्या ( सप्तपर्णी ) वना मुळे पुळूज या गावास पुळूज हे नाव पडले असावे.या गावात श्री लिंगेश्वराचे मंदिर असून मंदिरामध्ये तीन शिलालेख आहे. या शिवाय गावात मारुतीचे मंदिर असून मंदिरा समोर.वीरगळ व विविध मुर्ती आहेत. गावात बरीच मंदिरे असून गावातील लोक धार्मिक आहेत.
मध्ययुगात पुळूज हे गाव मोहोळ परगण्यात मोडत होते. असा उल्लेख सापडतो.या गावात श्री लिंगेश्वराचे प्राचीन मंदिर असून ते या गावातील लोकांचे ग्रामदैवत आहे.या मंदिरात सात शिवलिंग आहेत.या सप्त शिवलिंगा पैकी पहिले मुख्य शिवलिंग मंदिराच्या गर्भगृहात असून ते स्वयंभू शिवलिंग म्हणून ओळखले जाते.बाकीचे शिवलिंग मंदिराच्या प्रागणांतील मंदिरात आहेत. प्रत्येक शिवलिंगास स्वतंत्र मंदिर करण्यात आले आहे. मंदिरातील सात शिवलिंगाना गावातील लोक काशी शिवलिंग, त्रिबकेश्वर शिवलिंग, सुर्य तिर्थ शिवलिंग, सोमतिर्थ शिवलिंग, नागेश्वर शिवलिंग ,भिमाशंकर शिवलिंग या नावाने ओळखतात.यातील एक शिवलिंग सप्तमुखी शिवलिंग आहे.सप्तमुखी शिवलिंग म्हणजे सात मुख असलेले शिवलिंग.मंदिराच्या मध्यभागी सुरेख नंदी आहे. याच मंदिराच्या मागील प्रांगणात योगी सोमलिंग महाराज यांची संजीवनी समाधी आहे. समाधीच्या बाजूस ब्रम्ह देवाचे मंदिर आहे.
प्रांगणात असलेल्या त्रिबकेश्वर शिवलिंगाच्या मंदिराच्या डाव्या बाजूस दोन व उजव्या बाजूस एक असे तीन शिलालेख आहेत. या शिलालेखाचे वाचन इतिहास तज्ञ ग.ह खरे यांनी केले आहे. शिलालेखात
“राजा सिंघणदेव दुसरा यांच्या काळात म्हणजे १२ व्या शतकात या मंदिराचे बांधकाम करण्यात आल्याचा उल्लेख आहे. मंदिरासाठी पुळाई वनातील म्हणजेच पुळूज च्या आसपासची १७ गावची जमीन मंदिरास दान दिल्याचा उल्लेख आहे.”
मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर श्री अमोघदेव यांचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर पाहण्यासारखा आहे. मंदिराच्या चारही बाजूस स्मशानभूमी आहे.
पुळूज गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी श्री लिंगेश्वर कट्टा असून कट्टयाच्या चौथऱ्यावर चार परिवार देवता आहेत.गावातील चौकात मारूतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिरा समोर वीरगळ,गणपती आणि विविध देवदेवतांच्या मुर्ती एकत्र करून सुव्यवस्थित पणे ठेवण्यात आले आहेत.
पुळूज गावातील नदी पात्रात खडकावर रामाचे चरण पाद आहेत.ते साधारण: दीड फुट लांबीच्या आहेत. हे चरण पाद सतत पाण्यात असल्यामुळे त्याची पुजा व सेवा करणे अवघड जाते म्हणून गावकरी मंडळीनी श्री लिंगेश्वर मंदिरात राम,सीता आणि हनुमानाचे नवीन मंदिर बांधले आहे. या शिवाय गावात विठ्ठल रूकमीणी,सुर्यनारायण आणि दत्त मंदिर सुद्धा आहे.
आक्रमण काळात पंढरपूर येथील श्री विठ्ठलांची मुळ मुर्ती कुंभार गल्लीतील पांढरे वाड्यातील तळघरात ठेवण्यात आली होती असा उल्लेख” वारकरी पंथाचा इतिहास श्री पांडुरंग मुर्ती चा काल या प्रकरणात पान नंबर २५ वर आला आहे या पुस्तकाचे लेखक प्रख्यात विचारवंत सोनोपंत दांडेकर हे आहेत.”हा पांढरे वाडा दत्त मंदिराच्या शेजारी आहे. पुळूज गावात गणपती चौक आहे. चौकात गणपतीचे प्राचीन मंदिर असुन शेजारी सुर्य नारायणाचे मंदिर आहे.
मंदिराचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुळूज गावातील ग्रामस्थ श्री लिंगेश्वराची यात्रा कार्तिकी महिन्यात मोठ्या उत्साहात साजरी करतात.देवाची पालखी निघते.आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यात्रेसाठी उपस्थित असतात. पुळूज मधील ग्रंथकार सुर्याजी भोसले व परशुराम कोरे यांनी समग्र स्वयंभू श्री लिंगेश्वर पुराण हा ग्रंथ लिहीला आहे .तो अभ्यासकांच्या दुष्टीने महत्वपूर्ण आहे. पुळूज हे गाव ऐतिहासिक असल्यामुळे इतिहास अभ्यासकांनी एकदा तरी पुळूज गावास ऐतिहासिक संशोधनासाठी भेट द्यावी हीच अपेक्षा.

नितीन कृष्णानंद अणवेकर
इतिहास अभ्यासक
सोलापूर.