आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित सायक्लोथॉन रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.
हुतात्मा चौक चार पुतळा येथून सकाळी 6.30 वाजता सुरू झालेल्या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन 13 ते 17 ऑगस्टदरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, तहसीलदार अंजली मरोड, सहायक संशोधन अधिकारी विशाल मडके, 38 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार रामचंद्र, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक श्रीधर मोरे, मनपा क्रीडा अधिकारी नजीर शेख, कार्यासन अधिकारी सत्येन जाधव, दशरथ गुरव, प्रमोद चुंगे, विरेश अंगडी आदी उपस्थित होते.
या सायक्लोथॉन रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रीय खेळाडू, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, स्वामी समर्थ अकॅडमी, आर.एस.समर्थ अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. रॅलीचा मार्ग हुतात्मा चौक चार पुतळा, डफरिन चौक, रंगभवन, सात रस्ता, डी. आर. एम. ऑफिस, एम्प्लायमेंट चौक, डफरिन चौक, पार्क चौक ते हुतात्मा चार पुतळा असा होता.
पार्क चौकातील चार पुतळा येथे रॅलीचा समारोप झाला. मान्यवरांच्या हस्ते सहभागी सर्व ज्येष्ठ नागरिक, भारत स्काऊट
गाईड, विविध क्रीडा अॅकडमी प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. श्री. तारळकर यांनी सांगितले की, शनिवारी आझादी का अमृत महोत्सवांतर्गत वारसास्थळ यात्रा काढण्यात येणार आहे. शिवाय 14 ऑगस्टला मॅरेथॉन होणार असून यामध्येही नागरिकांनी सहभागी व्हावे.