Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन

मूल जन्माला आल्यापासून भाषा शिकत असते, कुटुंब हे त्याचे भाषा शिकण्याचे पहिले व्यासपीठ असते, तर शाळा महाविद्यालयापासून त्यांची भाषा समृद्ध होत जाते. प्रत्येक व्यक्तिने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. पण त्याच बरोबर इतर भाषेचा दुराभिमान करू नये, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे यांनी केला

    जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व हुतात्मा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कवी कुसुमाग्रज यांची जयंती “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार रामकृष्ण पुढाले होते.

यावेळी मराठी भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी आवश्यक बाबींवर डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले, प्रत्येक व्यक्तिने एखादा मराठी सिनेमा किंवा नाटक पाहिले पाहिजे. दैनंदिन व्यवहार मराठीतून केले पाहिजेत. बाजारपेठेतील फलक मराठीतून असले पाहिजेत. दैनंदिन जीवनातील पत्रव्यवहार हा मराठीतून केला पाहिजे. भिलार या पुस्तकाच्या गावाला भेट दिली पाहिजे. जोंधळे आजीने चालू केलेल्या पुस्तकाच्या हॉटेलसारखे प्रयत्न इतरत्र झाले पाहिजेत. एखाद्या कार्यक्रमास किंवा वाढदिवशी पुस्तकांची भेट दिली पाहिजे. अशा छोट्या – मोठ्या प्रयत्नांतून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कवि कुसुमाग्रज व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुत्रसंचालन वृषाली हजारे यांनी तर आभार ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी मानले.

याप्रसंगी जिल्हा संघाचे सहकार्यवाह अनसर शेख, संचालक सिद्धबा बंडगर, संचालिका सारिका मोरे, गणेश फंड, दत्ता मोरे, कट्टीमनी सर, सिद्धाराम बेडगनुर, राजश्री हक्के, नरसिंह मिसालालू, सौ. सारीका माडीकर, अरिहंत रत्नपारखे, प्रथमेश बनसोडे, अमित गायकवाड, रोहित राम, कृष्णा शेट्टी, बिरुराज फुलारी, सुरेश पाटोळे यांच्यासह शहरातील ग्रंथालय प्रतिनिधी, वाचक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *