MH 13 News Network
श्री तिरुपती देवस्थानचे अध्यात्मिक सल्लागार परमपूज्य ब्रह्मश्री डॉ. चागटी कोटेश्वर राव महाराज यांच्या प्रवचनमालेचे आयोजन ११, १२ व १३ मार्च रोजी सोलापूरात करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष भूपती कमटम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
अक्कलकोट रस्त्यावरील एस. व्ही. सी. एस. प्रशालेच्या (होटगी मठ) मैदानावर दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत श्रीकृष्ण लीलामृत कथा या विषयावर डॉ. चागंटी कोटेश्वर राव महाराज हजारो भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. चागंटी कोटेश्वर राव महाराजांची यापूर्वी सोलापुरात दोन वेळा प्रवचनमाला झाली असून यंदा वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान, संतोषी माता गोशाळेतर्फे ही प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. या प्रवचनमालेच्या स्वागताध्यक्षपदी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख असणार आहेत. यंदाच्या प्रवचनमालेस २० हजार भाविक उपस्थित राहणार असल्याचे डॉ. राजेंद्र गाजुल यांनी सांगितले. या प्रवचनमालेस शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, पालकांनी तसेच अधिकाधिक सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस डॉ. चागंटी कोटेश्वर राव महाराज प्रवचन समितीचे अध्यक्ष भूपती कमटम, संयोजक डॉ. राजेंद्र माजुल, वेणुगोपाल जिल्ला पंतुलू, सचिव व्यंकटेश नंदाल, रामकृष्ण दतात्रय बुरा, राजू उरगोडा आदी उपस्थित होते.