Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी धारिष्ट्य आणि मुत्सद्दीने
लोककल्याणकारी आदर्श राज्यकारभार केले: डॉ. केळे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात साजरा!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तिगत जीवनात व कुटुंबामध्ये अनेक कठीण प्रसंग आले. दुःखद घटना घडल्या, मात्र अहिल्यादेवींनी न डगमगता मोठ्या धारिष्टाने आणि मुत्सुद्दीपणाने प्रजाहित जपत लोककल्याणकारी आदर्श राज्यकारभार केल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबईचे संचालक व अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांनी केले.

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या चौथ्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. केळे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास घुटे, प्रभारी कुलसचिव सीए श्रेणिक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संगणकावर कळ दाबून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करीत अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रासंदर्भात विस्तृत माहिती दिली.

डॉ. केळे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अहिल्यापर्व सुरू झाले. सासरे मल्हारराव होळकर यांनी साथ दिल्याने सन 1767 ते 1795 या 28 वर्षाच्या कार्यकाळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकारभार केले. युद्धांना सामोरे जात व राज्य शांततेत ठेवत प्रजेला तात्काळ न्याय देत अहिल्यादेवींनी लोकांना सुखी व समाधान ठेवले. जगन्नाथपासून सोरटी सोमनाथ ते काशी विश्वेश्वरपासून ते केरळच्या रामेश्वरपर्यंत संपूर्ण भारतभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार करत स्थापत्यशास्त्राचा आदर्श व सुंदर नमुना त्यावेळी सिद्ध केला. जलव्यवस्थापनाचे आदर्श कार्य केले. अनेक विहिरी, बारवा, तलाव, घाट आदी निर्माण करीत राज्य समृद्ध करण्याचा अहिल्यादेवींनी प्रयत्न केला. त्यांच्या आदर्श कारभार व विचारांचा वारसा असेच पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार केल्यानंतर विद्यापीठाकडून अहिल्यादेवींच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू केले. आता 15 फुटी भव्य अशी अहिल्यादेवींच्या मूर्तीचे लवकर अनावरण करण्यात येणार आहे. स्मारकाचे काम देखील वेगाने सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांची युद्धनीती, आदर्श न्याय पध्दत हे त्याकाळी प्रसिद्ध होते. जलव्यवस्थापनाचे कार्य आजही आदर्श आहे. अध्यासन केंद्रात या सर्व बाबींवर संशोधन होईल. नेपाळमध्ये देखील त्यांनी केलेले जलव्यवस्थापनाचे कार्य आजही प्रसिद्ध असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेट सदस्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. तेजस्विनी कांबळे आणि प्रा. श्रुती देवळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *