MH13 News Network
सोलापूरच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकणाऱ्या कर्नाटकाच्या विरोधात कारवाई होऊन ही पाणी चोरी तात्काळ बंद होऊन उजनी-सोलापूर दुहेरी पाईप लाईनचे काम त्वरित सुरु व्हावे म्हणून निदर्शने आंदोलन….
सोलापूर शहरातील हद्दवाढ भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. धरणातून सोडलेले पाणी औज, चिंचपूर बंधाऱ्यात साठवून सोलापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. सोलापूर शहराला ५ दिवसाआड एकदा पाणी पुरवठा केला जातो. सोलापूर शहरातील जनता हक्काच्या पाण्यापासून वंचित असताना शेजारील कर्नाटक राज्य मात्र सोलापूरच्या या हक्काच्या पाण्यावर राजरोसपणे दरोडा टाकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून ही चोरी सुरु असतानादेखील शासन – प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही ही त्याहूनही खेदाची बाब आहे. सोलापूरकरांच्या खिशातून कररूपाने जमा होणाऱ्या पैशातून हा पाणी पुरवठा केला जात आहे. सोलापूरकरांच्या घामाच्या पैशावरचा हा दरोडा टाकलेला आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. उजनी ते सोलापूर या दुहेरी पाईप लाईनचे काम मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. ते काम जर वेळेत पूर्ण झाले असते तरी देखील अशी पाणी चोरी बंद झाली असती. निदान आता तरी प्रशासनाने जागे होऊन सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकणाऱ्या कर्नाटकाच्या या कृत्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. ही पाणी चोरी तात्काळ रोखावी.
तसेच तहानलेल्या सोलापूरकरांच्या भावनांचा संवेदनशीलतेने विचार करून उजनी- सोलापूर दुहेरी पाईप लाईनचे काम तात्काळ सुरु करण्यासाठी पाऊले उचलावीत अशी या आंदोलनाद्वारे आपल्याकडे मागणी करीत आहोत. सोलापूरच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज हे लक्षवेधी आंदोलन करीत आहोत. यापुढील काळात वरील समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा संभाजी आरमार चे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी दिलाय.
या आंदोलनादरम्यान संभाजी आरमार चे कार्याध्यक्ष शिवाजी तात्या वाघमोडे, गजानन जमदाडे, सुधाकर करणकोट, शशिकांत शिंदे आधी संभाजी आरमारचे कार्यकर्ते उपस्थित होते