Big9 News
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने डॉक्टर, स्वयंसेवी संस्था व शासकीय संस्था यांच्या संयुक्त पुढाकाराने परंडा येथे महाआरोग्य शिबिर आयोजित केले गेले होते व या शिबिरात दोन दिवसात या परिसरातील रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा मोफत पुरविण्यात आल्या, याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली असून आज मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. तानाजी सावंत व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातील अतिदुर्गम व गरीब रुग्णांना आरोग्यसेवा विविध माध्यमातून देण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला असून परांडा येथील महाआरोग्य शिबिराची नोंद ग्रीनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणे प्रेरणादायी बाब आहे . जनता, विविध स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने सामान्य माणसाला आरोग्य सेवा देण्याकडे व ती अधिक लोकाभिमुख करण्याकडे डॉ.सावंत यांचा दूरदृष्टीकोन असून सामान्य घटकाला आरोग्यसेवा दर्जेदार आणि सक्षमपणे व जवळच्या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी नवनवीन योजना आणि उपक्रम आखले जात आहेत.
मुंबई येथील कार्यक्रमात दक्षिण आफ्रिकेच्या राजदूत आंद्रेया कुहन , जॉर्जिया चे मानद राजदूत सतिंदर आहूजा, आमदार भारती लव्हेकर, सिनेक्षेत्रातील धीरज कुमार, जॉनी लिव्हर, डॉ.धर्मेंद्र पवार व विविध क्षेत्रातील डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड देण्यात आला. यावेळी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले व रुग्णांना विविध संस्था यांच्या माध्यमातून औषधोपचार, व्हीलचेअर, चष्मे यांचेही मोफत वाटप करण्यात आले .यावेळी मोठ्या संख्येने सिनेक्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.