Big9 News

तृणधान्यांमधील पोषणमूल्यांमुळे त्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांची गणना पौष्टिक तृणधान्य अर्थात ‘श्री अन्न’ अशी करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई व इतर लघु तृणधान्ये (कोडो, सावन, कुटकी, राळा) ही पिके मोडतात. या पिकांच्या उत्पादनात वाढ करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राज्याचा कृषी विभाग राबवित आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तृणधान्य उत्पादनाला चालना देणे, आपल्या या पारंपरिक अन्नाकडे अधिकाधिक नागरिकांना पुन्हा वळविणे यासाठी सातत्याने प्रयत्न राज्य शासनामार्फत केले जात आहेत. समाजातील विविध घटकांचा सहभाग यामधे घेतला जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही कृषी विभाग, आत्मा, ग्रामविकास यासह विविध विभागांच्या सहकार्याने या अभियानाला गती दिली जात आहे.

सर्वसाधारणपणे पौष्टिक तृणधान्ये ही ग्लुटेन फ्री असून त्यांचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी आहे. या पिकात मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ (Fibers), विविध खनिजे (Minerals), आवश्यक जीवनसत्वे (Vitamins) व समतोल प्रथिने (Protins) आहेत. पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन इ. सारख्या सूक्ष्म पोषक घटकाने समृद्ध असल्याने पौष्टिक तृणधान्ये ही विविध आजारांवर गुणकारी असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, ही बाब अधिक महत्त्वाची आहे.

राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वृद्धी करणे व या पिकांचे आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढविण्याकरिता प्रचार-प्रसिद्धी करणे हे उद्देश आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांचा यामध्ये समावेश आहे. कृषी विभागासोबतच शालेय व उच्च शिक्षण, महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास, ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, माहिती व जनसंपर्क यांच्याबरोबरच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये, हॉटेल असोसिएशन, शेफ असोसिएशन, वैद्यक संघटना, राज्यातील सर्व महानगरपालिका, सामाजिक संस्था व प्रक्रीयाधारक यांचे सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हास्तरीय कृषी महोत्सव,  मिलेट दौड (रन / वॉक फॉर मिलेट), पाककला स्पर्धा, आहारतज्ज्ञांची व्याख्याने, मिलेट ऑफ दि मंथ म्हणजेच “महिन्याचे तृणधान्य” संकल्पना राबविणे, महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग्स, बिलबोर्डस, बॅनर्स इ. द्वारे प्रचार प्रसिद्धी, मध्यान्ह भोजन आहार इ. मध्ये पौष्ट‍िक तृणधान्याचा समावेश करणे, शेफ असोशिएशनच्या माध्यमातून पाककृती तयार करणे, प्रचार-प्रसार करणे,  विद्यार्थ्यामध्ये आरोग्य व आहारविषयक जागरुकता निर्माण करणे या उपक्रमांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.

लोकांच्या आहारात पौष्टिक तृणधान्यांचा जास्तीत जास्त वापर वाढावा, त्यांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक व्हावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही त्यामुळे भर पडेल.