Big9 News
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.
मध्यवर्ती इमारतीमधील कृषी आयुक्तालयाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले तर बैठकीत आयुक्त कृषी सुनील चव्हाण, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगांवकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांना जी बियाणे पुरविण्यात येणार आहेत त्याबद्दलही जागरुक रहावे. उत्तमातील उत्तम बियाणे कसे मिळतील यादृष्टीने कार्यवाही करावी. राज्यातील चारही कृषी विद्यापिठांनी सातत्याने संशोधन करुन बियाणे निर्माण करावी. खाजगी बियाणे उत्पादक यांच्यासोबत बियाणांच्या बाबतीत निकोप स्पर्धा झाली तर निश्चितच त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. तसेच आपल्या उत्तम संशोधनाचे कृषि विद्यापिठांनी योग्य ते मार्केटिंग करावे व अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत त्याची माहिती पोहोचवावी.
शासनाच्या तसेच विद्यापिठाच्या अखत्यारीतील जमिनीवरही कृषि विभागामार्फत शेतीचे नवनवीन प्रयोग राबवून त्याची माहिती राज्याच्या सर्व भागातील शेतकऱ्यांना द्यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांचा पुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे तसेच बोगस बियाणे उत्पादकांवर कडक कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीच्या प्रारंभी कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ सभागृह नुतनीकरणाची माहिती दिली.
निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, अन्नधान्य पिके खरीप हंगाम 2023, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास येाजना आदी योजनांची सविस्तर माहिती दिली.
स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगांवकर यांनीही प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीबाबत मंत्रीमहोदयांनी आढावा घेतला.
यावेळी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे, मृदसंधारण व पाणलेाट क्षेत्र व्यवस्थापन संचालक रवींद्र भोसले,आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, राहूरी, अकोला व परभणी येथील कृषी विद्यापिठांचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply